चरण वाघमारेंचा पुढाकार : अपंग व्यक्तींना होणार साहित्याचे वाटपभंडारा : आरोग्याविषयी जनजागृती व्हावी आणि समाजातील सर्वच घटकातील नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना औषधोपचार मिळावे शस्त्रक्रिया करण्याची गरज भासल्यास शासकीय खर्चाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया व्हावी, या हेतूने तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकाराने १७ सप्टेंबर रोजी तुमसर येथील मातोश्री लॉनमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून शासकीय निधीतून जिल्ह्यात पहिल्यांदा अशा प्रकारच्या शिबिराचे हे पहिले आयोजन राहणार असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी गुरूवारला ‘लोकमत’ कार्यालयात सदिच्छा भेटीत सांगितले.या महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी, आरोग्य संचालकांसह शासकीय पॅनेलवरच्या सर्व डॉक्टरांच्या चमू उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्या रूग्णावर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता भासणार आहे. अशा सर्व रूग्णांना शिबिरातूनच शासकीय पॅनेलवरील रूग्णालयात रेफर करण्यात येईल. याशिवाय तुमसर व मोहाडी तालुक्यातील अपंग व्यक्तींना त्यांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. या शिबिरात १५ हजार लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ठ असल्याचे आ.वाघमारे यांनी सांगितले.या शिबिरादरम्यान रूग्णांची प्रवेशद्वारावरच नोंदणी करण्यात येणार असून तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येईल. याचठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था राहील. याशिवाय आमदारांच्या अध्यक्षतेत तयार केलेल्या नियोजन समितीत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक व तालुकास्तरीय विविध विभागाचे अधिकारी राहतील. यासोबतच मुंबई येथील जे.जे. रूग्णालयाचे डीन डॉ.तात्याराव लहाने यांची चमू येणार आहे. या शिबिरासाठी विजयश्री चॅरीटेबल ट्रस्ट भंडारा, सहयोग पतसंस्था तुमसर, मीनाताई ठाकरे पतसंस्था कांद्री यांच्यासह समाजसेवी संघटनांची मदत घेण्यात येणार असून जिल्हा मेडीकल असोसिएशन च्यावतीने मोफत औषधी देण्यात येणार असल्याचे आ. वाघमारे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
तुमसरात महाआरोग्य शिबिर
By admin | Updated: September 2, 2016 00:31 IST