लाखांदूर : रब्बीच्या हंगामात शेतकरी व्यस्त असताना कृषी सहायकांना रोजगार हमी योजनेच्या सर्व्हेक्षणाच्या कामाला लावण्यात आले आहे. त्यामुळे कृषी विभाग अपंग झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. दुसरीकडे शेतकरी कृषी कार्यालयात खेटे घालताना दिसत आहेत.या भागातील शेतकरी खरीप व रब्बीचे पीके मोठ्या प्रमाणात घेतात. यासाठी तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना गरज असते. परंतू, शासनाच्या नवीन परीपत्रकानुसार आधीच ७ कृषी सहायकांची पदे रिक्त असताना ऊर्वरीत ६ कृषी सहायक महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत २०१४-१५ च्या नियोजनानुसार ६३ ग्रामपंचायतींमध्ये जावून सर्व्हेक्षणाला लागले आहे. त्यामुळे कृषीविषयक अनेक कामे प्रलंबित आहेत. लाखांदूर तालुका कृषी कार्यालयात एकूण ३३ पदांपैकी १२ पदे रिक्त आहेत. रब्बी हंगामाला सुरवात झाली आहे. ८ ते २९ डिसेंबरपर्यंत सर्व्हेक्षणाचे काम सुरू राहणार असल्याने कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना पूर्णपणे बंद पडल्या आहेत. सन २०११-१२ मध्ये अवकाळी पावसामुळे दुष्काळी मदत वाटपसुद्धा होणार नाही. वर्ग दोनचे मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यालयीन कामे रखडली आहेत. या कार्यालयामार्फत गतीमान विकास कार्यक्रमाअंतर्गत चारा बियाणे वाटप, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत हरभरा, बियाणे वाटप इलेक्ट्रीक मोटारपंप वाटप तसेच५० टक्के अनुदानावर रासायनिक किटकनाशके, बुरशी नाश्के वाटप सुरू असताना या कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उन्हाळी धान पिक घेण्यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत पिक पद्धतीवर आधारित श्री पद्धत लागवडीसाठी ७५० प्रकल्प तालुक्यात राबविण्यात येणार आहेत. यात कृषी सहायकांची महत्वाची भूमिका असते. मात्र सर्वच्या सर्वच कृषी सहायकांना ग्रामपंचायतीची आयपीपीई करण्यासाठी सर्व्हेक्षणासाठी जुंपल्याने तालुका कृषी विभाग पुर्णत: अपंग झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कृषी सहायकांना जुंपले रोहयोच्या कामाला
By admin | Updated: December 11, 2014 23:01 IST