तुमसर : तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची राज्यात ख्याती आहे. तलावांचा जिल्ह्यातील बावनथडी धरण परिसरातील ३३ गावांमध्ये ३३ कोटींची पाणीपुरवठा योजना १५ वर्षांपूर्वी मंजूर झालेली आहे. याठिकाणी जलवाहिन्यांची कामे झालेली असली तरी शासनाकडून कंत्राटदाराला पैसे मिळाले नाही. परिणामी कंत्राटदाराने मजुरांना पैसे न मिळाल्यामुळे काम बंद झाले, परिणामी ही योजना रखडली.महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागामार्फत गोबरवाही ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची सुरुवात १५ वर्षापुर्वी झाली होती. या योजनेला बावनथडी धरणातून पाणी मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सितेकसा ते गोबरवाहीपर्यंत जलवाहिन्यांची कामे करण्यात आली. काही तांत्रिक कामे शिल्लक आहेत. गोबरवाही परिसरातील ३३ गावांना या योजनेतून शुध्द पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. योजनेचे इंटकवेल, जॅकवेल, पाणी शुध्दीकरण केंद्राची कामे झाली आहेत. परंतु येथील कंत्राटदाराला शासनाकडून कामाचे बील अगदी वेळेवर देण्याची सोय करण्यात आली होती. परंतु, या कंत्राटदाराने मजुरांना मजूरी न दिल्यामुळे त्यांनी ही कामे बंद केली. या योजनेच्या जलवाहीन्यांची कामे दहा वर्षीपुर्वी झाली आहेत. सध्या या योजनेची केवळ दहा टक्के कामे शिल्लक आहेत. या योजनेत समाविष्ट गावात जलकुंभसुध्दा तयार झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर, साकोली या तालुक्यातील अशा योजना कार्यान्वीत झाल्या आहेत. परंतु, गोबरवाही पाणीपुरवठा योजनेला अजूनही प्रतिक्षाच आहे. येथे धरणात मुबलक जलसाठा असूनही पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना कोरडीच आहे. (तालुका प्रतिनिधी)
बावनथडी धरण क्षेत्रातील पाणीपुरवठा योजनेची कामे ठप्प
By admin | Updated: November 22, 2014 00:11 IST