भंडारा : जिल्ह्याचे मुख्यालय लाभलेल्या व शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मोठा बाजारातील महिला प्रसाधन गृहाची दूरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागे असलेल्या या प्रसाधनगृहाच्या सभोवताल अतिक्रमणानेही विळखा घातला असून घाणीची समस्याही उग्र झाली आहे. या संदर्भात येथील महिला भाजी विक्रेत्यांनी महिला प्रसाधनगृहाची साफसफाई व सुरक्षेविषयी जिल्हाधिकारी तसेच भंडारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मोठा बाजारात धान्य गंज असलेल्या इमारतीच्या मागे महिला प्रसाधनगृह आहे. या भागात मोठ्या प्रमाणात घाण साचली असून दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रसाधनगृहात स्वच्छतेचा अभाव असून पाणी आणि विजेचीही समस्या आहे. शौचालय पूर्णपणे बंद असून सायंकाळच्या सुमारास प्रसाधनगृहात कुणीही जात नाही. प्रसाधनगृहाला लागूनच पाण्याची टाकी असून त्याखाली काही दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. याच अतिक्रमणाचा आडोसा घेऊन पुरुष मंडळी प्रसाधनगृहासाठी येतात. येथेच मद्यप्राशन करतात.परिणामी भर दिवसा आणि सायंकाळच्या सुमारास महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रसाधनगृहाची साफसफाई करून सुरक्षेविषयी गंभीर पावले उचलण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. (प्रतिनिधी)
आठवडी बाजारात महिला भाजी विक्रेते असुरक्षित
By admin | Updated: April 6, 2015 00:42 IST