कऱ्हांडला : घरात एकटीच असलेल्या महिलेच्या घरात चोरीकरिता गेलेल्या अज्ञात चोराची महिलेसोबत झटापट झाली. यात महिलेचा क्रूरपणे गळा आवळून खून केला. ही घटना राजनी येथे १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. नुसाबाई दादाजी रामटेके (५५) असे मृतक महिलेचे नाव आहे. नुसाबाई ही मुलासोबत राजनी येथे वास्तव्याला होती. पंजाबमधील काही नातेवाईक आठ दिवसांपूर्वी राजनी येथे आले होते. त्यांना परत जायचे असल्याने मृतक नुसाबाईच्या मुलाने त्यांना १५ जुलैला नागपूरला पोहचविले. दरम्यान ते सर्व नागपूर येथील नुसाबाईच्या भावाकडे थांबले. शुक्रवारी नातलग नागपूरवरुन पंजाबला जाणार होते तर मुलगा स्वगावी परतणार होता. घरी एकटीच असल्याने नसुबाई शेजारच्यांकडे बसली होती. व रात्री घरी परतली. तिचा मुलगा घरी नाही ती एकटीच आहे अशी पाळत अज्ञात चोराने ठेवली असावी. त्यामुळे चोराने तिच्या आधीच घरालगत अंधाराचा फायदा घेऊन दबाधरुन बसला असावा. नुसाबाई घरी परत आल्यानंतर त्याने घरात प्रवेश करताच दोघांमध्ये कदाचित दागिणे मागण्यावरून झटापट झाली असावी. यात चोराने तिचा निर्दयपणे गळा आवळून खुन केला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर चोराने तिच्या अंगावरील एकदाणी, डोरलामणी, गळसोळी, कानातील टॉप्स् असे सोन्याची दागीने व ४,००० रुपये रोख घेऊन मारेकरी पसार झाला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.नुसाबाईचा खून झाल्यानंतर तिच्या पायामध्ये चपला होत्या व ती खाली पडलेल्या अवस्थेत होती. नुसाबाई बऱ्याच वेळपर्यंत घराबाहेर दिसली नसल्याने सकाळी शेजारील महिलांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता ती खाली पडलेली दिसली. महिलांनी घरात प्रवेश केला. समोरील दृश्य बघून महिलांनी ओरडाओरड केली. घटनेची माहिती तिच्या मुलाला व पोलिसांना देण्यात आली. लाखांदूर पोलिसांनी भांदवि ३०२, ३९४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभारे करीत आहे. (वार्ताहर)
महिलेचा गळा आवळून खून
By admin | Updated: July 18, 2015 00:31 IST