डोंगरला येथील प्रकार : अदखलपात्र गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : ग्रामपंचायत डोंगरला येथील भ्रष्टाचार प्रकरणी माहिती पुरविल्याबाबत ग्रामपंचायत परिचरास महिला सरपंचाच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी परिचराने तुमसर पोलीस ठाण्यात महिला सरपंचाच्या पतीविरूद्ध तक्रार दाखल केली. तुमसर पोलिसांनी महिला सरपंचाच्या पतीविरूद्ध भादंवी ५०७ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. डोंगरला ग्रामपंचायतीचे परिचर खेमराज बाबुराव शरणागत (३५) रा. डोंगरला यांना डोंगरला येथील महिला सरपंचाचे पती मनोज हौसीलाल रहांगडाले (४३) रा. डोंगरला यांनी ग्रामपंचातीमधील भ्रष्टाचाराची माहिती प्रसिद्धी माध्यमाला दिल्याप्रकरणी परिचर खेमराज शरणागत यांना भ्रमणध्वनीवर अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याविरोधात परिचर खेमराज शरणागत यांनी मनोज रहांगडाले यांच्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तुमसर पोलिसांनी २१२/१७ भादंवि ५०७ कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. परिचर खेमराज शरणागत यांनी स्वत:च्या भ्रमणध्वनीवर संपूर्ण संभाषण रेकॉर्ड केले आहे. त्या अनुषंगाने नियमानुसार कारवाईची माहिती खेमराज शरणागत यांनी केली आहे. हे संपूर्ण संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे हे विशेष. पंचायतराज व्यवस्थेअंतर्गत महिलांना ५० टकके आरक्षण प्राप्त झाले आहे. सत्ता महिलांच्या हाती यावी हा उदांत्त हेतू शासनाचा होता, परंतु अनेक गावात महिलेऐवजी त्यांचे पतीच सत्ता सांभाळीत असल्याचा प्रकार सध्या दिसत आहे. केवळ कागदोपत्री काही महिला पदावर असून वास्तविक सत्ता त्यांच्या पतीराजाकडेच आहे ही खरी शोकांतिका आहे.
महिला सरपंचाच्या पतीने परिचराला दिली जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 00:50 IST