लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोका वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या कवलेवाडा गावाशिवाराच्या शेतामध्ये काम करणाऱ्या महिलेवर हल्ला करून वाघाने बळी घेतला. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेला रात्री उशिरा हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने वनविभागाचे वाहन पेटवून दिले. एवढेच नाही तर सुमारे १५ वन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना घेराव करून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ व्यक्तींना गुरुवारी ताब्यात घेतले असून, दुपारी तणावपूर्ण वातावरणात महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान हल्ल्याची घटना घडली होती. यात नंदा किशोर खंडाते (४५) या महिलेचा मृत्यू झाला होता. वनविभागाला कळवूनही ते वेळेवर न पोहचल्याने गावकऱ्यांचा रोष होता. आधी वाघाला मारा नंतरच प्रेत काढा, अशी गावकऱ्यांची मागणी होती. यादरम्यान घटनास्थळी सुमारे तीन हजारांवर नागरिकांचा संतप्त जमाव होता. वाघ प्रेताजवळच बसलेला होता. तोडगा निघत नसल्याने गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. जमावाने रात्री उशिरा वनविभागाचे वाहन (एमएच ३६ / के १७७) पेटवून दिले. एवढेच नाही तर पोहोचलेल्या १५ कर्मचाऱ्यांना बैलबंडीच्या उभारीने मारहाण केली. अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपवनसंरक्षक राहुल गवई यांनाही घेराव केला. सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांनाही धक्काबुक्की झाली.
तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कारगुरुवारी महिलेचा मृतदेह गावात आणण्यात आला. मात्र गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी होती. वनविभागाने नियमानुसार २५ लाखांची मदत जाहीर केली असून, १५ लाख रुपयांचा धनादेश महिलेच्या नातेवाइकांना सोपविला. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले.
वाहन जाळल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ व्यक्तींना ताब्यात घेतल्याने जमाव अधिकच आक्रमक झाला. त्यांना सोडणार नाहीत तोवर महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने प्रकरण अधिकच चिघळले. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी जमावाला शांत केले. अखेर रात्री उशिरा पोलिस आणि वनविभागाने नागरिकांची समजूत काढली.
४.१५ वाजता वाघ गोरेवाड्यात रात्री उशिरा या वाघाला गोरेवाडा येथील केंद्रात पोलिसांच्या चोख बंदोबस्तात रवाना करण्यात आले. पहाटे ४.१५ वाजता तो गोरेवाडा येथे पोहोचल्याची नोंद घेण्यात आली.