लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील दुर्गा नगरातील दलित वस्तीत अंगणवाडी केंद्रच नाही. यामुळे एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ येथील बालके व महिलांना मिळत नाही. परिणामतः त्या कुपोषित होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत.
मिड डे मिल, वैयक्तिक आहार, बालके व गर्भवती महिला कुपोषण अभियान, लसीकरण आरोग्य आहार पोषण अभियान, बालकांची पोषण आणि आहार सुधारणा, पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य तपासणी संदर्भ सेवा, आरोग्य आहार शिक्षण, लेक लाडकी अशा कितीतरी अनेक योजना एकात्मिक महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी केंद्रामार्फत राबविल्या जातात.
मात्र, दुर्गा नगरातील दलित वस्तीत अंगणवाडी केंद्रच नसल्याने येथील महिला व बालके मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत. परिणामी, दुर्गा नगर दलित वस्तीतील लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. पात्र लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जोडून योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सर्व्हे करून किमान दुसऱ्या अंगणवाडीला जोडादुर्गा नगर दलित वस्तीतील गरजू पात्र महिला व बालकांना एकात्मिक महिला व बाल विकास अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. गरोदर माता, स्तनदा माता व शून्य ते ५ वयोगटातील बालकांचे सदर विभागामार्फत सर्वेक्षण करावे. या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी पात्र लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जोडून योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
"दुर्गा नगर दलित वस्तीमध्ये अंगणवाडी केंद्र नसल्याने अनेक वर्षापासून गरोदर माता व बालकांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. याबाबत शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र, अजूनपर्यंत येथे अंगणवाडी केंद्राला मंजुरी मिळाली नाही."- नेहा मोटघरे, सामाजिक कार्यकर्त्या