तर्कवितर्काना ऊत : प्रकरण साकोली ठाण्यातील लाचेचेसंजय साठवणे । लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारला येथील पोलीस ठाण्यात सापळा रचून पोलिसांच्या नावावर पैसे घेणाऱ्या एका दलालाला रंगेहाथ अटक केली. परंतु या प्रकरणात गुंतलेल्या पोलिसाच्या नावाचा कारवाईत कुठेही उल्लेख आला नसल्यामुळे हे प्रकरण साकोली पोलीस दडपण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना? असा प्रश्न साकोलीत उपस्थित झाला आहे. या प्रकरणातील सत्य गुलदस्त्यात असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर पैशाची मागणी करणारा पोलीस कोण व त्याला वाचविणारा अधिकारी कोण? याचा उलगडा होईल.साकोली तालुक्यातील परसटोला येथील एका तरूणाने साकोली पोलीस ठाण्यात येथील एक पोलीस कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचेकडे केली. तक्रारीनुसार त्या पोलीस कर्मचाऱ्याने यापूर्वी याच युवकाकडून २० हजार रूपये घेतले व नंतर पुन्हा १५ हजार रूपयाची मागणी करू लागला. या प्रकरणात त्या युवकाचा व त्याच्या साथीदारांचा काहीच संबंध नसल्याचे व त्या पोलिसाकडून वारंवार होणाऱ्या मानसिक व आर्थिक त्रासामुळे त्या युवकाने या प्रकरणाची तक्रार दिली.तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व पोलीस ठाण्यात एका इसमाला १५ हजार रूपयाची लाच घेताना पकडले. मात्र ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या नावे तक्रार देण्यात आली होती त्याच्यावर कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सदर पैसे घेणारा इसम हा पोलिसाचा हस्तक होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पैसे घेणाऱ्याने कुणाच्या इशाऱ्यावर पैसे घेतले व ते पोलीस ठाण्याच्या आवारात दिले आणि त्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले असे असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी शांत कसे? पैशाची मागणी एक पोलीस कर्मचारी करीत असल्याची तक्रार दिली असतानाही बाहेरच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात शंका कुशंकांना पेव फुटले आहे. साकोली पोलीस ठाण्यात याच दलालामार्फत अनेक प्रकरणात पैसे घेतल्याच्या चर्चा आहेत. यात पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्याचीही नावे चर्चेत आहेत.या प्रकरणात ज्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्याचा संबंध आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. तपासाअंती कायदेशीर कारवाई करू.- विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली.सदर प्रकरण गंभीर असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावर कुठलिही भूमिका घेतली नाही. लाच घेणारा हा पोलिसाचा हस्तक होता. यापूर्वी दलालामार्फत पैशाची देवाण घेवाण झाली. काल ही घटना पोलीस ठाण्यात घडली. त्यामुळे या प्रकरणाला जबाबदार धरून साकोलीचे ठाणेदार व ज्या पोलिसाने दलालामार्फत पैसे घेतले त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.-नेपाल रंगारी, जिल्हा परिषद सदस्य
लाचेची मागणी करणारा तो कोण?
By admin | Updated: June 29, 2017 00:41 IST