पाणी विसर्ग करण्याची गरज : ६० गावात पाणीटंचाई, तुमसर पालिकेतर्फे कॅनल तयार मोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी प्रकल्पातून सोडलेले पाणी कवलेवाडा बॅरेजपर्यंत पोहचले नाही. कवलेवाडा बॅरेजमधून पाणी सोडण्याकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची गरज आहे. कवलेवाडा ते माडगी अंतर २० कि.मी. तर बावनथडी प्रकल्प ते कवलेवाडा बॅरेजचे अंतर ४० कि.मी. इतके आहे.पाणी टंचाईवर मात करण्याकरिता प्रयत्नशील असले तरी बावनथडी प्रकल्पातून पाणी विसर्ग केल्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. कवलेवाडा बॅरेजमध्ये पाणी उपलब्ध आहे. परंतु अदानी वीज कारखाना येथून पाण्याचे उचल करतो. बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग २० दिवसापूर्वी करण्यात आला. विसर्ग केलेले पाणी शेती तथा पाणपुरवठा योजनेच्या कामात आले. बपेरा पर्यंत बावनथडी प्रकल्पाचे पाणी काही प्रमाणात नदीपात्रात पोहचले. त्यापुढे प्रकल्पाचे पाणी पुढे सरकले नाही. कवलेवाडा बॅरेजपर्यंत पाणी पोहचले नाही. बावनथडी नदी ही बपेरा येथे वैनगंगा नदीत संगम पावते. नदी कोरडी पडल्याने बहुतांश पाणी कोरडी नदीच गिळंकृत करते.कवलेवाडा बॅरेजनंतर ४० ते ५० गावे, तुमसर शहरात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तुमसर नगर परिषदेने माडगी (दे) नदीपात्रात १२ मार्च, १२ एप्रिल, २५ एप्रिल रोजी डोहातून इंटकवेल केले. १ कि.मी. पर्यंत नदीपात्रात चर खोदून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपर्यंत पाणी पोहचवले. तुमसर नगरपरिषदेने शर्थीचे प्रयत्न सुरु केले. शहरात काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. तुमसर शहराला दररोज २८ लिटर पाणीपुरवठा करणे सध्या सुरु आहे. तुमसर शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये याकरिता उपाययोजना करण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा सभापती मेहताबसिंग ठाकुर यांनी सांगितले. शहरात पाणी टंचाईवर मात करण्याकरिता उपाययोजना करण्यात येत आहे. नदीपात्रात इंटकवेल करण्यात आले. टँकरने काही वॉर्डात पाणी पुरवठा सुरु आहे. पाणी बचतीकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. - प्रदीप पडोळे,नगराध्यक्ष, तुमसर.
बावनथडीचे पाणी बॅरेजपर्यंत पोहोचलेच नाही
By admin | Updated: May 11, 2017 00:21 IST