भंडारा : शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे पीक कर्ज वितरीत करीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देणाऱ्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जाची वसूली करतानाही अग्रक्रम राखला आहे. गेल्या आर्थिक वर्षात २४९ कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप करणाऱ्या बँकेकडून ३१ मार्च अखेरपर्यंत २०१ कोटी रूपयांची पीक कर्ज वसूली करण्यात आली आहे. कर्ज वसूलीचे प्रमाण ८१ टक्के इतके आहे. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मागीलवर्षी शासनाकडून २०५ कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तथापि बँकेने २४९ कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरीत करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. गतवर्षीच्या खरीप आणि रबी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पीक कर्जाची अपेक्षानुरूप वसूली होणार नाही, अशी भिती निर्माण झाली होती. परंतु बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्या नेतृत्वात संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियान राबविले. त्यामुळे २०१ कोटी पर्यंतची कर्ज वसूली करता आली.शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १ लाख रूपयापर्यंतच्या पीक कर्जावर व्याज आकारले जात नसून ३१ मार्च पर्यंत परतफेड केल्यास व्याज सवलतीचा लाभ मिळतो. शेतकऱ्यांच्या लाभाच्या या योजनेबाबत बँकेच्या संचालक मंडळाने जिल्ह्यात व्यापक प्रसार करुन शेतकऱ्यांनीही परतफेडीला सहकार्य केले. पीक कर्जाच्या वसूलीबरोबरच बँकेने गैरकृषी कर्जाची ३५ कोटी रूपयांची थकित वसूली दिली असून मागील आर्थिक वर्षात ३० कोटी रूपयांचे व्याजही वसूल केले. (नगर प्रतिनिधी)
पीक कर्ज वसुलीत जिल्हा बँकेची भरारी
By admin | Updated: April 10, 2015 00:42 IST