मोहाडी : मेहनतीने चांगले दिवस बघायला मिळतात. परिस्थिती बदलण्याची ताकत निर्माण करा. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर आयुष्याचे वीस वर्ष अभ्यासात घालवा. यशाच्या श्रेयात आई-बाबा व गुरूजनांना समान श्रेयाची संस्कृति जपा. स्पर्धेत स्वत:ला ओळखा. मोठे ध्येय ठेवा. निश्चित ध्येय, जिद्द, सातत्य व परिश्रमाने माणूस मोठा होतो, असा कानमंत्र मोहाडीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी विद्यार्थ्यांना दिले.मोहाडी येथील विणकर सांस्कृतिक भवनात स्वर्गीय फत्तू बावनकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहावी, बारावी व पदवीमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ घेण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना तहसीलदार डहाट यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभू मोहतुरे होते. अतिथी वासुदेव बांते, सुर्यकांत सेलोकर, श्रीधर हटवार, रामरतन खोकले, बाळू बोबडे, आनंद पराते, दिलीप उके, रागिनी सेलोकर, निलकंठ पुडके आदींची उपस्थिती होती. यावेळी वासुदेव बांते यांनी कठिण स्पर्धेत कठिण मेहनत करा, अभ्यासात प्रामाणिकपणा ठेवा, परिश्रमाने सर्व शक्य करता येते, असे मत व्यक्त केले.यानंतर इयत्ता १० वी, १२ वी, पदवी परीक्षेत उत्कृष्ठ गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृती मेडल, प्रमाणपत्र देवून अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच राजकारण, सामाजिक क्षेत्र, पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्यांचाही शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विजय पारधी यांनी केले. आभार प्रदर्शन सदाशिव ढेंगे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
मोठे होण्यासाठी जिद्द हवी
By admin | Updated: August 14, 2014 23:34 IST