Waiting for debt relief for ten thousand farmers | दहा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
दहा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा

ठळक मुद्दे१६ वी ग्रीन लिस्टयेणार : दोन वर्षात भंडारा जिल्ह्यातील ७९ हजार १२३ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. दोन वर्षात या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८९ हजार ६२६ कर्जदार शेतकऱ्यांपैकी ७९ हजार १२३ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.
नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. २८ जून २०१७ रोजी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला.
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. जिल्ह्यातील ८९ हजार ६२६ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. राज्य सरकारने आतापर्यंत १५ ग्रीनलिस्ट जारी केल्या असून त्यानुसार जिल्ह्यातील ७९ हजार ३२८ शेतकऱ्यांना २२१ कोटी ६२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.
थकीत शेतकऱ्यांमध्ये जिल्हा बँकेच्या २४ हजार १०२ शेतकऱ्यांना ९४ कोटी ९६ लाख, राष्ट्रीयकृत बँकाच्या ५४५३ शेतकऱ्यांना २७ कोटी ७१ लाख आणि ग्रामीण बँकेच्या १५८५ शेतकºयांना ८ कोटी ४५ लाख रुपयांची अशी ३१ हजार १४० शेतकऱ्यांना १३० कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तर प्रोत्साहनपर लाभ देण्यात आलेल्यांमध्ये जिल्हा बँकेचे ४१ हजार ७९० शेतकऱ्यांना ६३ कोटी ६४ लाख राष्ट्रीयकृत बँकेच्या २९३३ शेतकऱ्यांना ७ कोटी २० लाख, ग्रामीण बँकेच्या २०५९ शेतकऱ्यांना ३ कोटी ६६ लाख असे ४६ हजार ७९२ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
एकरकमी योजनेअंतर्गत जिल्हा बँकेच्या ६४४ शेतकऱ्यांना ८ कोटी २ हजार, राष्ट्रीयकृत बँकेच्या ५१८ शेतकऱ्यांना ५ कोटी ११ लाख आणि याशिवाय ग्रामीण बँकेच्या २१४ शेतकऱ्यांना १ कोटी ६४ लाख असे १३७६ शेतकऱ्यांना १४ कोटी ७७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आलेला आहे.

एकरकमी कर्ज भरणाऱ्या थकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची ही मोठी संधी आहे. नवीन आदेशानुसार ३१ आॅक्टोंबरपर्यंत अंतीम मुदत वाढविण्यात आली आहे. कर्जमाफी आणि पीक कर्जाबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहे.
- मनोज देशकर
जिल्हा उपनिबंधक, भंडारा

नव्या आदेशाने व्याप्ती वाढली
कर्जमाफी योजनेत सुरुवातीला १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ पर्यंतच्या थकीत आणि नियमित कर्ज भरणाऱ्या अशा दोन श्रेणी शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार होता. यात थकीत कर्जदारांना संपूर्ण कर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत होता. मात्र गत वर्षी यात नविन अध्यादेश काढण्यात आला. १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००९ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आला. योजनेची व्याप्ती वाढविल्याने योजनेच्या लाभ घेणाऱ्यांच्या तक्रारीतही वाढ झाली होती. भंडारा जिल्ह्यात थकीत कर्जदारांपेक्षा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळाला. जून अखेरपर्यंत ३१ हजार १४० थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांना १३० कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. तर दुसरीकडे नियमित कर्ज भरणाऱ्या ४६ हजार ७८२ शेतकऱ्यांना ७४ कोटी ५ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले.


Web Title: Waiting for debt relief for ten thousand farmers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.