वैनगंगेच्या पुराचा दरवर्षी 83 गावांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 05:00 AM2021-09-15T05:00:00+5:302021-09-15T05:00:51+5:30

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे विशाल पात्र आहे. वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे वसली आहे. त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २२, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३ आणि लाखांदूर तालुक्यातील नऊ गावांचा  समावेश आहे. गोसेखुर्द येथे धरण झाल्यापासून पुराची तीव्रता वाढली आहे. प्रकल्पातून अतिरिक्त झालेले पाणी विसर्ग केल्यानंतर धरणाखालील गावात पूरस्थिती निर्माण होते. 

The Waingange floods hit 83 villages every year | वैनगंगेच्या पुराचा दरवर्षी 83 गावांना बसतो फटका

वैनगंगेच्या पुराचा दरवर्षी 83 गावांना बसतो फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याची जीवनदायी म्हणून ओळखली जाणारी वैनगंगा पावसाळा आला की कोपते. दरवर्षी येणाऱ्या पुराचा वैनगंगा नदीतीरावरील तब्बल ८३ गावांना फटका बसतो. १८ गावांचा तर संपर्क तुटतो. गतवर्षीच्या महापुराने तर सर्व उद्ध्वस्त झाले होते. यानंतरही पूरसंरक्षक भिंत आणि पुनर्वसनाकडे दुर्लक्ष होते. पूर ओसरला की सर्वच पूरग्रस्तांच्या समस्यांकडे पाठ फिरवितात. त्यामुळे दरवर्षी पावसाळा आला की ८३ गावांतील नागरिक जीव मुठीत घेऊन राहतात.
भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगेचे विशाल पात्र आहे. वैनगंगेच्या तीरावर ९९ गावे वसली आहे. त्यापैकी ८३ गावांना पुराचा फटका बसतो. त्यात भंडारा तालुक्यातील २२, मोहाडी १२, तुमसर १५, पवनी ३३ आणि लाखांदूर तालुक्यातील नऊ गावांचा  समावेश आहे. गोसेखुर्द येथे धरण झाल्यापासून पुराची तीव्रता वाढली आहे. प्रकल्पातून अतिरिक्त झालेले पाणी विसर्ग केल्यानंतर धरणाखालील गावात पूरस्थिती निर्माण होते. 
पाणलोट क्षेत्रात पुरेसे पाणी विसर्ग झाले नाही की बॅक वॉटर अनेक गावांमध्ये शिरते. भंडारा तालुक्यातील अर्जूनी, कोरंभी, पिंडकेपार, सुरेवाडा, मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज., ढिवरवाडा, घाटकुरोडा. तुमसर तालुक्यातील परसवाडा, तामसवाडी. पवनी तालुक्यातील सावरगाव, पवना खुर्द, जुनोना या गावांचा संपर्क तुटतो. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील कालीसराट आणि पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचा विसर्गही या गावांसाठी धोकादायक असतो. त्यामुळे पूर येतो.

असा बसला आतापर्यंत महापुराचा फटका 
- दरवर्षी पुराचा फटका बसत असला तरी गत २० वर्षांत चार वेळा नदीतीरावरील नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे. १४ ते १७ सप्टेंबर २००५ मध्ये वैनगंगेला महापूर आला होता. त्यात चार हजार लोक पूरबाधित झाले होते. ८ सप्टेंबर २०१९ रोजी संजय सरोवरातून पाणी सोडण्यात आल्याने भंडारा शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील विविध भागांत पाणी शिरले होते. गतवर्षी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या काळात महापूर आला. संजय सरोवरातून पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरफच्या तीन चमूंना, एसडीआरएफच्या तीन चमूंना पाचारण करण्यात आले होते. ४४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. चौघांचा महापुरात मृत्यू झाला तर शेकडो हेक्टर जमीन नष्ट झाली होती.

प्रशासनाच्या उपाययोजना 
- वैनगंगा नदीच्या महापुराचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यंदा सज्ज झाले आहे. आंतरराज्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली. जिल्हा नियंत्रण कक्ष, पाटबंधारे विभागाचा नियंत्रण कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्ष एकमेकांच्या संपर्कात आहे. पूरपरिस्थिती उदभवल्यास काय करता येईल याची रंगीत तालीमही घेण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षी सुरूवातीपासूनच गोसेप्रकल्पातील पाणी नियंत्रणीत पद्धतीने सोडले जात आहे. त्यामुळे सध्या तरी कुठेही पूरस्थिती निर्माण झाली नाही.

 

Web Title: The Waingange floods hit 83 villages every year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.