लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा जिल्ह्याला फटका बसला असून आधारभूत खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानासह रब्बी पिकांचे यामुळे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी जिल्ह्याच्या सर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून, यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. वाराही वेगाने वाहू लागला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साधारणत: १५ मिनिटे झालेल्या या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून पडला. गहू, हरभरा, उडीद, मूग, लाखोरी आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात अर्धा तास चांगलाच पाऊस बरसला. भंडारा शहरालगत असलेल्या कारधा येथील हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहरात सकाळी तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारच्या तुलनेत दोन अंश घट नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला असून या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख अभिषेक नामदास यांनी दिली.
तुमसर-मोहाडी तालुक्यात नुकसानतुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अवकाळी पाऊस झाला. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. तालुक्यातील ग्रामीण भागात या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला. पवनारा येथे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. दिवसभर वातावरणात गारवा होता. मोहाडी तालुक्यातील लोहारा, जांब, कांद्री परिसरासह इतर भागात पाऊस झाला.