लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आल्यावर दोन दिवस उपचार घेतले. त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी (२३ फेब्रुवारी) प्रचंड वेदना सुरू झाल्याने पुन्हा त्याच रुग्णालयात आणत असताना वाटेवरच रात्री ११ वाजता महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली.
सुनीता सयाम (२४) असे मृत महिलेचे नाव असून ती आष्टी (ता. तुमसर) येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ महिने पूर्ण झाल्यानंतर, कुटुंबियांनी तिला २० फेब्रुवारीला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दोन दिवसांनंतर तिला सुटी देण्यात आली. २३ तारखेला गावाला गेल्यावर पुन्हा महिलेला प्रचंड त्रास सुरू झाला. त्यामुळे सायंकाळी तिला कुटुंबियांनी आधी नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉ. पल्लवी घडीले यांनी तपासल्यावर महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्याने तातडीने तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला २५ किलोमीटर अंतर गाठून नेले जात असताना वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी तपासणी करून ती मृत असल्याचे घोषित केले.
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाने दिलेला मेमो आणि मृत महिलेचा पती दुर्गेश सयाम यांच्या जबाबाच्या आधारे, तुमसर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तुमसरातून का सुटी दिली ?२० तारखेला या महिलेला दाखल केल्यावर दोन दिवस उपचार केल्यानंतर तिला सुटी का देण्यात आली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नातेवाइकांनी तिला परत नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे याचाही तपास होण्याची गरज आहे.
गोबरवाहीचे रेल्वे फाटक ठरले काळया महिलेला रात्री नाकाडोंगरीवरून तुमसरच्या रुग्णालयात आणत असताना गोबरवाही येथील रेल्वे फाटक बंद होते. बराच वेळ ते बंद राहिले. या दरम्यान महिलेची प्रकृती अधिकच खालावून ती निपचित पडली. याच ठिकाणी तिचा मृत्यू झाल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. फाटक सुरू असते तर, कदाचित रुग्णालयात वेळेवर पोहचता आले असते.
"या महिलेच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात तिने दोन दिवसांपूर्वी उपचार घेतले होते. मात्र तिला सुटी का देण्यात आली, याचीही चौकशी केली जाईल. कारण पुढे आल्यावर कारवाईची शिफारस केली जाईल."- मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा