लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी निघणार आहे. शहराबाहेरून बायपास महामार्गाचा प्रश्न मार्गी लागला असून, वैनंगा नदीवर दोन नवीन सहा पदरी पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. ४२१ कोटी रुपयांचे खर्च यासाठी अपेक्षित असून, मुजबी ते शिंगोरीपर्यंतचा हा रस्ता सहा पदरी राहणार आहे. भंडारा हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना क्रमांक - ६) वर वसले असून, दहा वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात मुजबी ते शिंगोरीपर्यंतच्या रस्त्याचे मार्ग तसाच होता. शहरातून गेलेल्या महामार्गाने अनेकदा अनेक अपघात घडले. अनेकांचा जीवही गेला. मात्र, बायपास किंवा शहरातून महामार्गाचे विस्तारीकरण होण्याबाबतचा तिढा कायम होता. गत दोन वर्षांपासून या कामाकडे सर्वांचेच लक्ष होते. अंतरिम डीपीआर सादर केल्यानंतर याबाबतचे काम पुणे येथील स्वामी समर्थ नामक एका कंपनीला देण्यात आले आहे. सहा पदरी असलेला हा महामार्ग भंडारा बाहेरून जाणार आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ४२१ कोटी ४० लक्ष रुपये इतकी आहे. भंडारा बायपास या रस्त्याचे बांधकाम अंदाजे १४.८० किलोमीटर असून, ते २१ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्य रस्त्याची रुंदी ३२ मीटर राहणार असून, सर्व्हिस रोडची रुंदी सात मीटर व लांबी १७.४६ किमी आहे. महामार्गाच्या कडेला दोन मीटर फूटपाथसह राहणार आहे. या महामार्गावर १७ ठिकाणी अंडरपास राहणार आहे. ६० हेक्टर जमिन संपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली असून, यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली होती. आधुनिक पद्धतीने वैनगंगा नदीवर दोन विशालकाय पुलांची निर्मिती हेच आवाहनात्मक काम ठरणार आहे.
आज होणार भूमिपूजन- बहुप्रतिक्षित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भंडारा बायपासचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्या, गुरुवारी (दि. ३) दुपारी ४ वाजता केले जाणार आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर ना. गडकरी यांच्याहस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचेही उद्घाटन होणार आहे.