अधिकारी फिरकलेच नाहीत : साकोली तालुक्यात महिनाभरातील चौथे आंदोलनसाकोली : या महिन्यात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे तीनदा शाळा बंद आंदोलन झाले असून चौथे आंदोलन वडद येथे कालपासून सुरु आहे. मात्र वडद येथे दोन दिवसांच्या आंदोलनात शिक्षणविभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी फिरकले नाहीत.पंचायत समिती साकोली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. या शाळेत वर्ग १ ते ७ असून या शाळेची विद्यार्थी संख्या ही १३८ एवढी आहे. या शाळेत एकूण सहा शिक्षकांची पदे मंजूर असून सद्यपरिस्थितीला येथे पाच शिक्षक कार्यरत आहेत. तर एक पदवीधर शिक्षक कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शालेय व्यवस्थापन समिती, गावकरी, पालक व ग्रामपंचायततर्फे पंचायत समितला शिक्षकाच्या मागणीसंदर्भात निवेदन देण्यात आली. मात्र या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. परिणामी काल दि. १४ ला पालकांनी आपल्या मुलांना शाळेतच पाठविले नाही. त्यामुळे कालपासून वडद येथील शाळा भरलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या शाळा बंद आंदोलनाची माहिती प्रभारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने कालच गटशिक्षणाधिकारी यांना लेखी स्वरुपात कळविली. मात्र शिक्षण विभागाने या शाळेत ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे दोन दिवसापासून ही शाळा बंद आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन दिवसांपासून वळद शाळा बंद
By admin | Updated: December 16, 2014 22:46 IST