लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : दोन राज्यांना जोडणारा भंडारा- बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचा विषय मागील चार वर्षांपासून अधांतरीच राहिला आहे. या महामार्गाचे नाव जुलै २०२१ मध्ये केंद्र शासनाच्या गॅझेटमध्ये प्रकाशित झाले होते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला अद्याप प्रारंभझालेला नाही. वरठी, मोहाडी, तुमसर येथील बायपास रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अजूनपर्यंत मंजुरी दिली नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून भंडारा-बालाघाट महामार्गासाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, विशेषतः वरठी, तुमसर शहर आणि मोहाडी परिसरासाठी बायपास रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. परंतु, हा अहवाल अद्याप राष्ट्रीय महामार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. प्राधिकरणाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
रस्त्याची दुरवस्था, अपघातांचे सत्र सुरूचतुमसर ते भंडारा दरम्यानचा सध्याचा मार्ग खड्यांनी भरलेला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना मार्ग ओळखणे कठीण होते. त्यामुळे अनेक वेळा दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनधारक अपघातांचे बळी ठरत आहेत. या रस्त्याने जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.
सध्याची स्थितीभंडारा, मोहाडी तुमसर वापरापर्यंत या रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. तुमसर-भंडारा बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर वरठी, मोहाडी व तुमसर बायपास रस्त्याचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्यापपर्यंत मंजुरीच दिली नाही. त्यामुळे या महामार्गाचे काम रखडल्याची माहिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
३७ कोटी रुपये मंजूरभंडारा बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे व सरफेस दुरुस्ती करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुमारे ३७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. परंतु, भंडारा ते बपेरापर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.
"भंडारा-बालाघाट या राष्ट्रीय महामार्गावर भंडारा जिल्ह्यातील वरठी, मोहाडी व तुमसर येथील बायपास रस्त्याच्या डीपीआर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मंजुरीकरिता पाठविला आहे. मंजुरी मिळताच बांधकामाला सुरुवात करण्यात येईल."- सुनील मानवटकर, उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भंडारा.