भंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या चौकोनी लढतीमुळे सर्वपक्षीय उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला असून, स्वकीयांची नाराजी सांभाळत विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहेत. विशेष करून उमेदवारीवरून स्वकीयांवर नाराज झालेली मंडळीच या निवडणुकीत ‘हुकमी एक्के’ ठरू पाहत असल्याने पडद्याआडच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिकच महत्त्वाची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागल्यामुळे विशेष करून शिवसेना - भाजपाच्या इच्छुकांच्या अपेक्षांना मोठया प्रमाणात धुमारे फुटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यावरून त्यांच्यातील स्पर्धा टोकाला गेली आहे. त्यातून निवडणूकीची घोषणा होण्यापूर्वी युती होईल, असेच चित्र असल्याच्या कारणावरून तर जागा सुटेल की नाही, उमेदवारी मिळेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती मिळत नसल्याने अनेकांनी पक्षांतर करून उमेदवारीसाठी दावेदारीही केली. प्रत्यक्षात युती दुभंगल्याने दोन्ही पक्षांत अनेकांना संधी मिळाली असली, तरी जागा एक व इच्छुक अनेक असल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजीही व्यक्त होऊ लागली. अशा परिस्थितीत बहुरंगी लढतीत स्वकीयांतील नाराजांबरोबरच विरोधकातील नाराजांवर निवडणूकीच्या यशाचे गणित अवलंबून असल्याने व तीच डोकेदुखी असल्याने अघिकृत उमेदवारांनी त्याकडे गांभीर्याने घेण्यासाठी सुरूवात केली आहे. स्वकीयांची नाराजी पक्षाचे नेते काढतील असे गृहीत धरून विरोधी पक्षातील नाराजांना गळ टाकला जात आहे. त्यांची नाराजी मतांमध्ये परिवर्तन व्हावी, यासाठी थेट नाराजांशी न बोलता, दिवसातील उजेडाऐवजी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकरवी ‘समेट’ घडविण्यासाठी सुरूवात केली आहे. यासाठी रात्रीचा अंधारच अधिक प्रभावी ठरू लागला आहे. त्यात राजकीय डावपेच व व्युहरचना आखले जात आहेत. निवडणूक रिंगणातील जवळपास सर्वच उमेदवारांनी अशा प्रकारच्या छुप्या तडजोडींना प्राधान्य देत त्यातून निवडणूक सोपी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
स्वकीयांपेक्षा विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न
By admin | Updated: October 4, 2014 23:23 IST