मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर शहरातून आंतरराज्य मार्ग जातो या मार्गाने दररोज शेकडो ट्रकची वाहतूक होते. धावत्या ट्रकमधून रस्त्यावर रेती, फ्लाय अॅश, मुरूम खाली पडतात. त्यामुळे रस्त्यावर धूळच धूळ पसरली आहे. ट्रक व टिप्पर वाहतुकीदरम्यान येथील वातावरणात धूळ दिसते. या धुळीमुळे दृश्यमानताही कमी होत असते. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
सर्दी, खोकला व शिंका होण्याच्या त्रास वाढला आहे. नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. तुमसर शहराला अजूनपर्यंत बायपास रस्ता झालेला नाही. मध्यप्रदेशातून येणारी जड वाहतूक शहरातील मुख्य रस्त्याने सुरू आहे. परिणामी याचा त्रात तुमसरवासियांना भोगावा लागत असल्याचे वास्तव आहे.
शहरातील श्रीराम नगरातून ट्रक व टिप्पर मोठ्या प्रमाणात चोवीस तास धावतात. यात रेती, फ्लाय अॅश, माती व मुरूम वाहतुकीच्या ट्रकची संख्या अधिक आहे. या ट्रकमधून वाहतुकीदरम्यान रस्त्यावर रेती, फ्लाय अॅश मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरते. ही अॅश नाका तोंडाव्दारे शरीरात जात आहे. परिणामी आरोग्याची शक्यता नाकारता येत नाही. रूमाल व स्कार्फ वापरावे लागत आहे.
दृश्यमानता होते कमीतुमसर शहरातील मुख्य मार्गावर धुळीच्या वाढत्या प्रमाणामुळे दृश्यमानता कमी होते. विशेषतः रात्रीच्या वेळेस ही दृश्यमानता कमी होते. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. नागरिकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर रुग्णालय, बसस्थानक व दुकाने आहेत. हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे.
फ्लाय अॅशचे कण धोकादायकफ्लाय अॅशचे कण डोळ्यासाठी अत्यंत घातक आहेत. ही धूळ डोळ्यात गेल्यानंतर डोळे लाल होऊन खाजवतात. डोळ्यातून सतत पाणी बाहेर पडते. काही तास डोळ्यांची आगसुद्धा होते. त्यामुळे यावर गंभीर दखल घेण्याची गरज आहे.