तुमसर : तालुक्यातील पवनारखारी येथील मरस्कोल्हे आदिवासी अनुदानित आश्रमशाळेतील वर्ग ७ वी चा विद्यार्थी प्रफुल झळीराम वरकडे या विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापनेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. मात्र अधिकाऱ्यांनी शाळेवर कोणतीही कारवाई न करता शाळा व्यवस्थापनाला अभय दिला. तसेच मृतकाच्या पालकाला कुठलीही मदत न दिल्याने आदिवासी बांधवांमध्ये रोष निर्माण झाला आहे. परिणामी न्यायाकरिता आदिवासी रस्त्यावर उतरणार आहेत.दि. २९ जुलै रोजी प्रफुल वरकडे (१२) याची प्रकृती आश्रम शाळेतच बिघडल्याने जवळच्या गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले. परंतु जवळच पालकाचे गाव असून देखील पालकाला माहिती देण्यात आली नाही. दि. ३० जुलै रोजी माहिती दिली असता तिथून तुमसर भंडारा येथे हलविण्यात येत असल्याचे सांगितले. प्रफुलला काय झाले? त्याला नागपूर का हलविण्यात आले, हे समजण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी डॉक्टरांमार्फत त्याच्या मानेजवळ सूज असल्याचे सांगितले. ती सूज कशामुळे आली त्याची चौकशी होणे गरजेचे होते. विद्यार्थ्याचा शवविच्छेदन केले असते तर याचा उलगडा झाला असता. मात्र आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाने त्या मुलाचे शव विच्छेदन करू दिले नाही व प्रकरण दडपण्याचा प्रकार केला. आतापर्यंत विद्यार्थ्याचा आश्रमशाळेत असताना मृत्यू झाल्याची ही सहावी घटना आहे. एकदा तर शाळेची मान्यताही काढली होती. मात्र अजूनपर्यंत यात काही सुधारणा न होता बालकांचा बळी जाण्याचा प्रकार सुरुच आहे. (शहर प्रतिनिधी)
आदिवासी विद्यार्थी उतरणार रस्त्यावर
By admin | Updated: August 13, 2015 01:31 IST