लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तिरोडी ही प्रवासी गाडी मागील २९ सप्टेंबर पासून पहाटे सुरू करण्यात आली. परंतु या गाडीला प्रवासी मिळत नसून दररोज सुमारे ४० ते ४५ हजारांच्या महसुलाचे नुकसान होत आहे. सदर गाडी सकाळी १० वाजता सोडण्याची गरज आहे.मागील २२ मार्चपासून तुमसर तिरोडी प्रवासी गाडी बंद होती. तब्बल १८ महिन्यानंतर २९ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. परंतु सदर गाडी तुमसर रोड रेल्वे स्थानकातून ४.१५ सुटते. परत ही गाडी सकाळी सात वाजता तुमसर रोड रेल्वे स्थानकात येते. त्यामुळे या मार्गावर सदर गाडी ला प्रवासी मिळत नाही. सध्या ही गाडी विनाप्रवासी धावत आहे. त्यामुळे रेल्वेचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. सदर गाडी सकाळी १० वाजता सोडण्यात आली तर त्या गाडीला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल. परंतु याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून प्रवाशांमध्ये नाराजी आहे.तुमसर रोड रेल्वे स्थानकात ही गाडी सकाळी ७ वाजता आल्यानंतर पुढे इतवारी रेल्वेस्थानकापर्यंत जात नाही. त्याकरिता रेल्वे प्रशासनाने अजून पर्यंत मंजुरी दिली नाही. पूर्वी ही गाडी दिवसातून तीन वेळा ती रोड पर्यंत जात होती ती केवळ दिवसातून एकदाच धावत आहे. तिरोडी ते कटंगी पर्यंत नवीन रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आला. परंतु या मार्गावर रेल्वे प्रशासनाने गाडी सुरू करण्याचा निर्णय अजूनपर्यंत घेतला नाही. पुरणाचे नियम शिथिल करण्यात आले परंतु रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. उलट बस व इतर वाहने पूर्ववत सुरू झाली आहेत. रेल्वे मार्गावरील प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. किमान सकाळी १०वाजता ही रेल्वे गाडी सोडण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एम.डी. आलम खान यांनी केली आहे.