आतेगाव येथील घटना : घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दीएकोडी : कोंडवाड्यात अंधार... मात्र कुणीतरी असल्याचा भास जाणवल्याने घरातील मंडळींनी त्याचा शोध घेतला. दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र दिवे लावण्याच्या प्रकारात कोंडवाड्यातही दिवे ठेवण्यासाठी गेलेल्या घरातील मंडळीला चक्क अस्वलीचे दर्शन झाले. विशेष म्हणजे या अस्वलीने तीन पिलांना याच कोंडवाड्यात जन्म दिला. सामान्यजणांमध्ये भीती पसरविणारी व तेवढीच कुतूहल घटना साकोली तालुक्यातील आतेगाव येथील उपसरपंच वसंता हटवार यांच्या मालकीच्या कोंडवाड्यात ऐन दिवाळीच्या दिवशी उघडकीला आली. कोंडवाड्यात एका अस्वलाने तीन पिलांना जन्म दिल्याची घटना वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सायंकाळच्या सुमारास या कोंडवाड्यात दिवे ठेवण्यासाठी गेले असता तिथे अस्वल असल्याचे कळले. कोंडवाड्यात एका अस्वलीने ठाण मांडल्याचे कळताच हटवार कुटुंबियांची भंबेरी उडाली. याची माहिती शेजाऱ्यांसह क्षणात ग्रामस्थांना कळली. कोंडवाड्याच्या सभोवताल बघणाऱ्यांची गर्दी क्षणोक्षणी वाढत होती. मात्र भितीपोटी अस्वलाजवळ जाण्याची हिंमत कुणाजवळ नव्हती. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. चमूही घटनास्थळी पोहचली. वृत्त लिहिपर्यंत सदर अस्वल तसेच तिच्या तीन पिलांना पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र पकडण्यात वनकर्मचाऱ्यांना यश मिळाले नाही. गाव परिसराला लागून जंगल आहे. या जंगलातून सदर अस्वलीने गावात प्रवेश करून पिलांना जन्म दिण्यासाठी या कोंडवाड्याचा आश्रय घेतला असावा असा कयास वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. २४ तासांपासून अस्वलीसह पिलांना वनविभागाचे कर्मचारी कसे ताब्यात घेतात हे बघण्यासाठी ग्रामस्थही आतुरलेले आहेत. (वार्ताहर)
ंअस्वलीने दिला तीन पिलांना जन्म
By admin | Updated: November 13, 2015 00:43 IST