लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सध्या साकोली-सेंदूरवाफा शहरातील व्यापाऱ्यांच्या आणि दुकानदारांच्या अतिक्रमणकाचा मुद्द गाजत असताना आता संतापजनक आणि तेवढाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'व्यापारी संकुल साकोली' या नावाने सन २०१२ मध्ये हजारोंच्या संख्येने जनतेकडून ५०० रुपये घेऊन पावती देण्यात आली. मात्र, १३ वर्षे लोटूनही व्यापारी संकुलाचा पत्ता नाही. त्यामुळे ५ लाखांहून अधिक रक्कम गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घोटाळ्याची तक्रार वरिष्ठांना करण्यात आली होती. मात्र, याची चौकशी अजूनही गुलदस्त्यातच आहे.
सन २०१२ मध्ये साकोली बाजारपेठेत दुकानांचे गाळे पंजीकरण करून जिल्हा परिषदेंतर्गत व्यापारी संकुलाकरिता माहितीपत्रिकासह फॉर्म भरण्यात आले. यातील एका पीडित अर्जदाराच्या कागदपत्रांनुसार त्यांच्याकडून फॉर्म नं. १० ची पावती क्र. ९५४८४२ बीके नं. ९३४९ नुसार ५०० रुपये घेतले गेले.
यात २४.०५.२०१२ अशी तारीख नमूद असून वर जिल्हा परिषद भंडारा व खाली पंचायत समिती असे इंग्रजीत ठळक अक्षरात लिहून आहे. फॉर्ममध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभाग अर्जावर आवेदन क्रमांक, दुकान गाळ्याचे क्षेत्रफळ नमूद करून रक्कम ३,४२५ रुपये अंकीत केले आहे. माहितीपत्रिकेत वर 'जिल्हा परिषद भंडाराद्वारा शासकीय मान्यताप्राप्त व्यापारी संकुल साकोली' असे चिन्हीत आहे. यामध्ये आर्किटेक्ट स्टुडिओ इलेव्हन दिल्ली नागपूर असे नकाशावर नमूद केले आहे. नकाशासह दिलेल्या या पुस्तिकेच्या मागील बाजूस योजना आरंभ व समाप्तीच्या तारखेचा आणि सोडत १५ जून २०१२ असा उल्लेख आहे.
चौकशीची मागणीयावर विश्वास ठेवून सन २०१२ मध्ये साकोली शहरातील सुमारे हजारो फुटपाथ दुकानदारांनी व गरीब व्यापाऱ्यांनी व्यापारी संकुलात दुकान मिळेल याच आशेने प्रत्येकी ५०० रुपये भरले होते. मात्र, मागील १३ वर्षापासून ना व्यापारी संकुल उभारले गेले, ना कुणाचे पैसे परत मिळाले. त्यामुळे तेव्हाचा प्रकार खरा होता, की कुणी फसवणूक करून रकमा उकळण्यासाठी हा प्रकार केला, याची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे.