लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तामसवाडीत जलजीवन मिशन हर घर नल योजनेत ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले. वर्षभरापासून जलकुंभात पाणीच आले नाही. वैनगंगा नदीकाठावर गाव असताना गावकरी तहानलेलेच आहेत. जलजीवन मिशनच्या कामात मोठी अनियमितता झाली असल्याने अन्य गावांतही या योजनेवर ताशेरे ओढले जात आहेत.
योजनेचे काम १ मार्च २०२३ ला सुरू करण्यात आले. योजनेवर ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात विंधन विहीर बांधकामात ८४ हजार रुपये खर्च दाखविण्यात आले आहे. ट्यूबवेलच्या कामात २ लाख २३ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असला, तरी गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. पम्पिंग मशिनरी १ लाख ३८ हजार आणि पंपगृहच्या निर्मितीसाठी २ लाख ५८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. याशिवाय उर्ध्व नलिका १४ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गावात पाणीपुरवठा करण्यासाठी वितरण नलिका देण्यात आलेल्या आहेत. यात सर्वाधिक ३९ लाख १७ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे गावात अभिनव टाकी उभी आहे. ही योजना बंद झाली असल्याने गावात अशा टाकी उभ्या आहेत. याच टाकीची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
या कामात ३ लाख ४७ हजार रुपयांची उचल करण्यात आली आहे. गावात नवीन टाकी जलकुंभ नव्याने बांधकाम करण्याची जुनी ओरड असताना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. नळजोडणीच्या कामात ६ लाख ६८ हजार, तर योजना चालविण्यासाठी ७८ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु योजनेच्या यशस्वीतेसंबंधाने व्यापक उपाययोजना झालेल्या नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
२०० कुटुंबे आजही नळ कनेक्शनच्या प्रतीक्षेतगावातील नळयोजना गावकऱ्यांना पाणीपुरवठा करीत असले तरी नळ कनेक्शनधारकांची मागणी ३५० कुटुंबांची आहे. गावात फक्त १५० कुटुंबीयांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. २०० कुटुंबे आजही नळ कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. या कुटुंबीयांना नळ कनेक्शन देण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना मंजूर करण्यात आली आहे.
हर घर नलचे स्वप्न भंगलेगावात हर घर नल देण्यात येणार असल्याने गावकरी उत्सुक झाले होते. या योजनेचे पाणी जलकुंभात पोहचले नाही. योजना यशस्वी झाली नसल्याने वसुली कुणाचे खिशातून करायचे असा सवाल गावात विचारले जात आहेत. पाणी पुरवठा होत नसल्याने खापर मात्र पदाधिकाऱ्यांवर फोडले जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या कामात झालेल्या अनियमिततामध्ये लक्ष घातले पाहिजे. अशी मागणी आहे.
६० फूट खोल बोअरवेल्स खोदकाम करण्यात आली आहे.गावात जलकुंभात पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरवेल्स खोदकाम केले. मात्र बोअरवेल्स कोरडीच निघाली आहे. त्यामुळे समस्येत भर पडली आहे.
"गावात जल जीवन मिशन हर घर नल योजना गावकऱ्यांना अभिशाप झाली आहे. योजनेच्या कामात रस्ते फोडले आहेत. योजनेवर लाखो रुपये खर्च झाले. परंतु एक थेंब पाणी नळाला पोहचले नाही. कंत्राटदारांनी मनमर्जीनुसार कामे केली."- अनिल वासनिक, उपसरपंच, तामसवाडी