भंडारा : भंडाऱ्यातील जवाहरनगर आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी जीवितहानी हानी झाली. या स्फोटात आठ जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झालेत. या स्फोटानंतर मृतांचे नातेवाईक व गावकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला असून घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला आहे.
भंडारा येथील आयुध निर्माण कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आठही मृतांचे प्रेत ठेवून नातेवाईक व गावकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. काहींनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे घटनास्थळी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत काल (२४जानेवारीला) भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर, पाच कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत. मृताच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांच्यानी शनिवारी सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठाण मांडत मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह घरी नेणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.
ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात २० वर्षीय अप्रेंटिस धारक अंकित बारई याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अंकित बारईचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. आर्थिक मदतीसह कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समावेश करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. शिवाय मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह घरी नेणार नाही, असा आक्रमक पवित्रा बारई यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे. आज पुन्हा संतप्त ग्रामस्थांनी आयुध निर्माणी फॅक्टरीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. साहुली गावातील २० वर्षीय अंकित बाराई या अप्रेंटीस करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरीतील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक झाली पाहिजे, अशा घोषणा देत गावाचे पुनर्वसन झाले पाहिजे, अशी मागणी या ग्रामस्थाकडून केली जात आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यामुळे घटनास्थळी सकाळपासून तणावाची स्थिती असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान कामगार मंत्री आकाश फुंडकर लवकरच घटनास्थळाला भेट देणार असल्याचे कळतेय.
या आहेत मृतांचे नातेवाईक व गावकऱ्यांच्या मागण्या
- आयुध निर्माणी कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा
- मृत कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे.
- गावाचे पुनर्वसन करा
घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी गठीतया घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी, यासाठी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी ९ सदस्यीय एक एसआयटी गठीत केली आहे. या एसआयटीत आयुध निर्माणी कंपनीतील कुणाचाही समावेश नसल्यानं ही चौकशी समिती निष्पक्षपणे चौकशी करेल, असा विश्वास निरुल हसन यांनी व्यक्त केला आहे.