मोहाडी : शाळांतर्गत विविध समित्या तयार करण्यात येतात. शाळेत सभांचे आयोजन केले जाते. परंतु शिक्षक व पालकांसाठी गठित करण्यात आलेल्या समितींच्या सभेला पालक येत नाहीत. सभेला पालक न येण्याची कारणे जाणून घेण्यासाठी मोहगाव (देवी) येथील महात्मा फुले शाळेच्यावतीने ‘शिक्षक पालकांच्या गावी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये विविध समिती तयार करण्यात येतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत समित्या बनविण्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. प्रारंभी निवडून आलेले सदस्य सभेला उपस्थित होतात. त्यानंतर मात्र बहुतेक सदस्य सभेकडे पाठच फिरवितात. तसेच खाजगी शाळांमध्ये पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, महिला तक्रार निवारण समिती, परिवहन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, पालक शिक्षक कार्यकारी समिती, शाळा विकास समिती, शुल्क नियंत्रण समिती अशा समिती गठित केले जातात. समिती गठित करण्याकरीता पालकसभा आयोजित करण्यात येते. परंतु पालक सभेला येत नसल्यामुळे शाळांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या समिती गठित केल्यानंतर विविध समितीच्या बैठका शाळा प्रमुख बोलावतात. पालकचे उदासिनत्व बैठकीतही दिसून येते. त्यामुळे मुख्याध्यापकांसमोर अडचणी येतात. कागदावरच बैठका घेऊन सदस्यांच्या सह्या घेणे हाच एक पर्याय मुख्याध्यापकांसमोर उरत असतो. याच पद्धतीने समितींचा कारभार सुरू असतो. खाजगी शाळांच्या बाबतीत बरेचदा असेच घडत असते. ग्रामीण भागातील पालक नकारात्मक भूमिका ठेवत असतो. केवळ बालकाला वयात येईपर्यंत शाळेत पाठवायचे. त्याच्या जीवनाची उन्नती शिक्षणातून होते. बालकांचे घडविण्याची, तयार होण्याची ताकद शिक्षणातच आहे. या बाबतीत ग्रामीण पालक अजूनही निरुत्साही आहेत. शिक्षणाबद्दलची उदासिनता सर्वेक्षणातून दिसून आली. शाळेत बालकांच्या अडचणी, समस्या, प्रश्न पालकांना समजून देण्यासाठी शाळेत पालक सभा बोलावली जाते. परंतु एक दोन पालकांशिवाय अन्य पालक शाळेत फिरकत नाही. ही बाब लक्षात घेऊन मोहगावदेवी येथील महात्मा ज्योतिबा फुले शाळेचे मुख्याध्यापक आर.वाय. बांते यांनी ‘शिक्षक पालकांच्या गावी’ हा उपक्रम राबविण्यासाठी सुरूवात केली. या शाळेत रोहणा, बोथली, मोहगावदेवी या गावातील विद्यार्थी येतात. त्यामुळे रोहणा व बोथली येथे पालक सभा आयोजित करण्यात आली. ही पालक सभा पालकांच्या रिकाम्या वेळेत सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली होती. या पालकसभेला गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य व पालक महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. या पालक सभेत केवळ विद्यार्थीकेंद्रीत विषयासोबत शौचालय जागरण, आम आदमी विमा योजना आदी सामाजिक हिताच्या योजना सांगून पालकांना जागरूक करण्याचे कार्य करण्यात आले. पालक सभेत कॉपीेमुक्त अभियान, गुणवत्ता विकास, अधिकचे तास, सराव परीक्षा, विद्यार्थी उपस्थिती, वार्षिक स्नेहसंमेलन आदी विषयावर पालकसभेत चर्चा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांनी राबविला ‘शिक्षक पालकांच्या गावी’ उपक्रम
By admin | Updated: December 2, 2014 22:59 IST