भंडारा : कमी व्याजदाराने कर्ज देणारी संस्था म्हणून नावारुपास आलेल्या येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने उपविधी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही. त्यामुळे ही संस्था तोट्यात जात असल्याचे जिल्हा विशेष लेखा परिक्षक (वर्ग १) सहकारी संस्था भंडाराच्या चौकशी अहवालात स्पष्ट झाले असून, ही संस्था दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे.२०१३-१४ च्या आर्थिक जमाखर्च पत्रकात संस्थेने उपविधी आणि नियमांचे पालन न केल्यामुळे तसेच विरोधी संचालकांचे मत ठराव नोंदवहित न नोंदविल्याने रमेश सिंगनजुडे, योगेश कुटे, तुळशीराम पटले, शंकर नखाते या संचालकांनी जिल्हा उपनिबंधक जिल्हा सहकारी संस्था भंडारा यांना ७ जुलै २०१४ ला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार उपनिबंधकांनी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक याशिवाय तक्रारकर्ते यांची सुनावणी ४ आॅगस्ट २०१४ व २ सप्टेंबर २०१४ ला आपल्या कार्यालयात ठेवली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी विशेष लेखा परीक्षणासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक (वर्ग १) सहकारी संस्था भंडारा यांना नियुक्त केले होते. लेखा परीक्षक श्रेणी २ सहकारी संस्था तुमसरचे टी.एम. नायंकुडे यांनी संस्थेची चौकशी केली. या चौकशीचा अहवाल त्यांनी जिल्हा उपनिबंधक भंडारा यांना १२ सप्टेंबर रोजी सादर केला. या अहवालानुसार संस्थेच्या सभासदाकडून ३१ मार्च २०१४ पूर्वी वसूल न झालेले व्याज ९३,६६,६११ रुपये नफयात उत्पन्न बाबीला घेण्यात आला. को-आॅपरेटिव्ह बँक भंडाराला ३१ मार्च २०१४ पूर्वी देणे असलेला व्याज २६,६६,१८१ रुपये देण्यात आले नाही. सदर व्याज खर्चबाबीमध्ये नफा काढण्यापूर्वी तरतूद करणे अभिप्रेत असल्याचे नमूद आहे. त्याचप्रमाणे एनपीएच्या तरतुदीनुसार ११,७४,३५० रुपये थकीत सभासदांची वसुली न आल्यामुळे तरतूद न करता नफ्यामध्ये दाखविण्यात आले आहे. संस्थेच्या नाममात्र (गैरसभासद) सभासदांकडून १२ टक्के व्याज दराने ३,५९,१७,५०१ रुपयांच्या मुदत ठेवी स्वीकारण्यात आल्या. भंडारा डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह बँकेकडून १२.५ टक्के व्याजदराने संस्थेने कित्येक कोटी रुपये कर्जाची उचल केली. यात मात्र सभासदांना ११ टक्के व्याज दराने कर्ज वाटप करण्यात आले. ही बाब संस्थेच्या उपविधीचे उल्लंघन करणारी असून संस्थेला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे.संस्थेच्या उपविधी क्रमांक १.४ नुसार व्याजाची आकारणी ३० सप्टेंबर व ३१ मार्चला करणे अभिप्रेत आहे. संस्थेने ३१ मार्चला मुदती ठेवीवर व्याज आकारणी करुन व्याजाची तरतूद नफ्यातून करणे आवश्यक होते. पंरतु तसे न केल्यामुळे नफा-तोटा पत्रकावर परिणाम झाला असून नफा वाढवून बोगस नफा दर्शविलेला आहे. ही बाब संस्थेचे उद्देश व पोटनियमाचे उल्लघंन करणारी आहे. त्यामुळे संस्थेला उत्पन्न कमी व खर्च जास्त होत आहे.परिणामी ही संस्था भविष्यात डबघाईला निघण्याची शक्यता असून, संस्थेच्या अध्यक्ष, सरव्यवस्थापक व संचालक मंडळाने तफावत दूर करावी, अन्यथा संस्था दिवाळखोरीत निघण्याची शक्यता असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. दरम्यान सदर संस्थेचे २०१३-१४ चे विशेष लेखा परीक्षण करावे, अशी मागणी तक्रारकर्त्या संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. (नगर प्रतिनिधी)
शिक्षक पतसंस्था दिवाळखोरीत!
By admin | Updated: September 24, 2014 23:25 IST