पुष्य नक्षत्राने तारले, रिमझिम पावसाने कोरडवाहू रोवण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:37+5:302021-08-01T04:32:37+5:30

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात पुनर्वसू नक्षत्राने दगा दिला. परंतु, पुष्य नक्षत्राच्या आरंभापासून रिमझिम पावसाने जोर धरल्यामुळे ...

Survived by the constellation Pushya, drizzle drizzle drizzle | पुष्य नक्षत्राने तारले, रिमझिम पावसाने कोरडवाहू रोवण्यांना वेग

पुष्य नक्षत्राने तारले, रिमझिम पावसाने कोरडवाहू रोवण्यांना वेग

Next

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात पुनर्वसू नक्षत्राने दगा दिला. परंतु, पुष्य नक्षत्राच्या आरंभापासून रिमझिम पावसाने जोर धरल्यामुळे कोरडवाहू शेतांमध्ये रोवण्यांसाठी गर्दी वाढली आहे. सिंचनाची साधने असलेल्या बहुतेक शेतक-यांची रोवणी झाली असून पाऊस सुरू राहिल्यास १५ दिवसांत रोवणी अंतिम टप्प्यात येण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ६० टक्क्यांपेक्षा जास्त रोवणी पूर्णत्वास आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतच्या चारही नक्षत्रांतील पडलेल्या पावसाचा अभ्यास केल्यास, मृग नक्षत्राच्या बारा-तेराही दिवशी पाऊस झाला; पण पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. त्यामुळे कधी नव्हे ते यंदा बहुतांश शेतकऱ्यांना चिखल पेरणी करावी लागली. नक्षत्रात दहा ते अकरा दिवस पाऊस पडला. या नक्षत्रात सुरुवातीला हलका पाऊस पडला. मात्र, आर्द्राच्या शेवटी दोन दिवस का असेना मुसळधार पाऊस बरसला. आर्द्राच्या या पाण्याने सिंचनाची सोय असलेल्या निलज बु., देव्हाडा बु., मोहगाव, करडी, निलज खुर्द परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली होती. पण, आर्द्रातही शेतातील पेरणी सुरूच होती. कुठे पेरणी, कुठे रोवणी अशी वेगळीच परिस्थिती होती.

पुनर्वसूने आर्द्रानंतर दोन दिवस थांबून पुढच्या दोन दिवसांत चांगलेच झोडपून काढले. धो-धो पावसामुळे रोवणीच्या कामांचा वेग वाढला, कामे वाढली. परंतु त्यानंतर मात्र, पावसाच्या पाण्याची खरी गरज असताना पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्राने मोठी निराशा केली. पाऊस तर रोजच येतोय पण नावालाच, अशी अवस्था या दोनही नक्षत्रांत होती. परवापर्यंत रिमझिम असाच पाऊस सुरू होता; त्यामुळे पाऊस पडूनही शेतात वा जलसाठ्यात अजूनही वाढ झालेली नाही.

धानाचे पेरे रोवणीयोग्य झाल्यावरही शेतात पाणी न साचल्याने बहुतांश कोरडवाहू शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली होती. चिखल्या पावसाच्या अनियमिततेने रोवणी लांबली. शेवटी, सिंचनाचा पर्याय असलेल्या शेतकऱ्यांनी जलस्रोतातून अगदी वेळेवर पैसा खर्च करून पाणी इंजिनद्वारे आणले आणि रोवणीची कामे वेळेवर केली. दुसरीकडे कोरडवाहू शेतात पावसामुळे अडथळ्यांचा डोंगर उभा झाला होता.

बॉक्स

शेतशिवारात रोवणीची लगबग

शुक्रवारी सकाळपासून पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यासह परिसरातही रोवणीला पुन्हा गती आली आहे. शेतशिवारात खरीप हंगामातील सुगीच्या दिवसांचे म्हणजेच रोवणीचे चित्र दृष्टीस पडत आहे. एकाच शेतातल्या एका बांधित महिला-पुरुष मजूर हाताने धान वाफे काढताना, दुसऱ्या बांधित ट्रॅक्टर वा बैलजोडीने चिखलणी तर तिसऱ्या बांधित रोवणी सुरू असल्याचे दृश्य नजरेस पडत आहे. शुक्रवारच्या पावसाने खऱ्याखुऱ्या पावसाळ्याचे दिवस भासत असल्याचे सांगून शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. करडी, पालोरा, निलज बुज, देव्हाडा बु. परिसरात थांबलेल्या, न सुरू झालेल्या रोवण्या आता पुन्हा सुरू होऊन यंदा तरी भरघोस उत्पन्न पदरी पडेल, अशी आशा बळीराजा बाळगून आहे.

310721\img-20210731-wa0056.jpg

पुष्य नक्षत्राने तारले, रिमझिम झळीने कोरडवाहू रोवण्यांना वेग

Web Title: Survived by the constellation Pushya, drizzle drizzle drizzle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.