भंडारा : ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी घरोघरी नळ पोहोचावे यासाठी शासन-प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहेत. भंडारा तालुक्यातील खुटसावरी, पिंपळगाव, माडगी, कोकणागड येथे आज ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन जलस्त्रोताची पाहणी केली. त्यानंतर गावातील सर्व्हे करण्यात आला.
तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी समस्या लक्षात घेता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग भंडारा विभागाचे अभियंता एस.एन. बघेले, शिशुपाल रिनायत यांनी पिंपळगाव, खुटसावरी, माडगी, कोकणागड येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी नियोजित पाइपलाइनसाठी यंत्राद्वारे मोजणी केली. प्रत्येक नागरिकांसाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावातील शुद्ध पाण्याचा पुरवठा योजनांची मागणी, आखणी, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्तीसंबंधी उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. २५ लाखांपर्यंत जलस्त्रोतांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी मिळावे यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनी पाठपुरावा केल्यास पाणी समस्या सोडविण्यास अडचण येणार नाही; यासाठी पदाधिकाऱ्यांनी कागदपत्रांची योग्य पूर्तता करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामसेवक प्रदीप चेटले, मंगेश हुमणे, वरकडे, भलावी, सुरेश उईके, पडोळे, गजभिये, रुस्तम टेंभुर्णे यांच्यासह प्रत्येक गावातील पदाधिकारी व युवक मंडळी उपस्थित होती.
अनेक वर्षांपासून बंद असलेला पुरवठा सुरु
भंडारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलकुंभ तयार करण्यात आले; मात्र ते जलकुंभ नावापुरतेच उरले होते. या वर्षापासून पाणीपुरवठा विभागाने बंद असलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजना सुरळीत केल्या आहेत. खुर्शिपार, माडगी, राजेगाव येथे पाणीपुरवठा सुरळीत सुरु आहे. पाण्याचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत.