तुमसर : तीन चाकी सायकलने घरी जाताना एका रानडुकराने दिव्यांग तरुणावर हल्ला चढविण्याची घटना तुमसर तालुक्याच्या सुकळी नकुल ते गोंडीटोला मार्गावर शुक्रवारी दुपारी घडली. जीवाच्या आकांताने त्याने रानडुकराला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका वाहनाने तेथे आलेल्या मजुरांमुळे त्याचे प्राण वाचले.योगेश्वर केवल राऊत (४५) रा.सुकळी नकुल असे दिव्यांग तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी तो गोंडीटोला येथून सुकळी नकुल या गावी आपल्या तीनचाकी सायकलने जात होता. पायाने दिव्यांग असलेल्या योगेश्वरवर सुकळी नजीक जंगलातून आलेल्या एका रानडुकराने हल्ला केला. रानडुकराच्या धडकेत त्याची तीनचाकी सायकल उलटली. तो खाली पडला. त्याला उठून बसता येत नव्हते.त्यावेळी चवताळलेले रानडुकर त्याच्यावर तुटून पडले. हातात आलेल्या काठीने जीवाच्या आकांताने तो रानडुकराचा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्यात यश येत नव्हते. पायाला आणि मानेला रानडुकर कडाडून चावा घेत होते. सुदैवाने त्याचवेळी तेथून मजुरांचे वाहन जात होते. हा प्रकार बघताच ते मदतीला धावले. मात्र चवताळलेले रानडुक्कर पाहून जवळ जाण्याची कुणाची हिंमत नव्हती. वाहनातील लाकडी बल्लीच्या सहाय्याने रानडुकराला पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला. परंतु जिद्दी रानडुक्कर त्यालाही जुमानत नव्हते. त्याचवेळी परिसरातील काही मोकाट कुत्रेही योगेश्वरच्या मदतीला धावून आले. काही वेळाच्या झुंजीनंतर रानडुकराला पिटाळून लावण्यात यश आले. मजुरांचे वाहन आले नसते तर दिव्यांग योगेश्वर या हल्ल्यातून बचावणे कठीण होते.रानडुकराच्या हल्ल्यात योगेश्वरचा पायाला, पाठीला जबर दुखापत झाली आहे. पाठतर अक्षरश: सोलून निखाली आहे. ट्रॅक्टरमधील मजूरांनी त्याला तात्काळ सिहोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे.
सुकळीच्या दिव्यांग योगेश्वरची तासभर रानडुकरासोबत झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:33 IST
तीन चाकी सायकलने घरी जाताना एका रानडुकराने दिव्यांग तरुणावर हल्ला चढविण्याची घटना तुमसर तालुक्याच्या सुकळी नकुल ते गोंडीटोला मार्गावर शुक्रवारी दुपारी घडली. जीवाच्या आकांताने त्याने रानडुकराला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका वाहनाने तेथे आलेल्या मजुरांमुळे त्याचे प्राण वाचले.
सुकळीच्या दिव्यांग योगेश्वरची तासभर रानडुकरासोबत झुंज
ठळक मुद्देपायाला, पाठीला गंभीर दुखापत।ट्रॅक्टरमधून आलेल्या मजुरांमुळे वाचले प्राण