वरठी : सनफ्लॅग कंपनीतील स्थायी व कंत्राटी कामगाराच्या वार्षिक वेतन वाढ, बोनस व किमान वेतन इत्यादी मागण्या सनफ्लॅग व्यवस्थापनाने मंजुर केल्या. ४ डिसेंबर पासून कंपनीत अभिनव आंदोलन व चर्चा सुरू होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्या समक्ष झालेल्या बैठकीत प्रती कामगारांना ६ हजार ६६५ रूपये वेतनवाढ देण्याचे कंपनीचे मान्य केले. हा करार ३१ मार्च २०१६ पर्यंत राहील. मागण्या मंजुर झाल्यामुळे कंपनीत सुरू असलेले संपाचा तिढा सुटला असून कामगारात आनंदात संचारला आहे.सनफ्लॅग कंपनीत दर तीन वर्षांनी कार्यरत स्थायी व कंत्राटी कामगारांना वेतन वाढ, बोनस व किमान वेतनवाढ देण्यात येते. या संदर्भात कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात करार ३१ मार्च २०१४ मध्ये संपुष्टात आला. तेव्हापासून कामगार संघटनानी सनफ्लॅग व्यवस्थापनाकडे आपल्या मागण्याचे पत्र दिले. दरम्यान अनेकदा चर्चा बैठका झाल्या. पण सनफ्लॅग व्यवस्थापनाच्या चालढकल वृत्तीमुळे मागण्या मंजुर झाल्या नाही. दिवाळीपुर्वी बोनस करीता बैठक झाली. त्यात तात्पुरता तोडगा निघाल्यामुळे तृर्तास संप टळला होता. दिवाळीनंतर इतर मागण्या संदर्भात निर्णय घेणे आवश्यक होते. तोडगा निघाला नाही.सनफ्लॅग व्यवस्थापन हेतुपरस्पर चालढकल करीत असल्यामुळे कामसंघटनानी ४ डिसेंबर पासून अभिनव आंदोलन सुरू केले. तीन महिन्यापासून आंदोलन सुरू होते. सुरूवातीला विरोध म्हणून काळ्याफिती लावण्यात आल्या. त्यानंतर घोषणा व नंतर अधिकाऱ्याचा घेराव करण्यात आला. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री व कामगार संघटनेचे अध्यक्ष नितीन गडकरी, कंपनीचे मालक रविभूषण भारद्वाज, एस.के. गुप्ता, महाव्यवस्थापक प्रभाकर कोलतेवार, शातिश श्रीवास्तव व संघटनाचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद वासनिक, महासचिव मिलिंद देशपांडे, किशोर मारवाडे, विजय बांडेबुचे, विजेंद्र नेमा, विकास फुके, रविंद्र बोरकर, अमोद डाकरे, ज्ञानेश्वर वंजारी, रमेश बालपांडे, शिवकुमार सार्वे, डी. यादव यांच्या उपस्थितीत नागपुर येथे बैठक घेण्यात आली. चार तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर पुढील तीन वर्षाकरीता प्रति कामगार ६६५० रूपये वेतनवाढ निर्णयावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यात आला. प्रत्येक कामगारांना त्यांच्या श्रेणीनुसार वेतनवाढ मिळणार आहे. वरिष्ठ कामगारांना ७ हजार ५०० रूपयाच्या वर वेतनवाढ मिळणार असून यांचा सरळ लाभ स्थायी व कंत्राटी कामगारांना होणार आहे. (वार्ताहर)अभिनव आंदोलनामुळे यशकोणत्याही कामगार संघटनाचे आंदोलन हे कामगार व कंपनीला नुकसान देणारे ठरते. अशात आंदोलन चिघळले तर कंपनी बंद मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. हे समस्या ओळखून गत वर्षाभरापासून येथील संघटनांनी सावध भूमिका घेतली. मागण्यासाठी आंदोलन केले व कंपनी बंद ठेवली नाही. सर्व मजूर नियमित कामावर जायचे व कामाची वेळ सुरू पुर्वी आणि काम संपल्यावर एकत्र येऊन घोषणा व अधिकाऱ्याचा घेराव करायचे. या आंदोलनाचे यश हे यामुळे फलीत झाले.‘त्या’ आनंदाचे रहस्यकामगारांना पगारवाढ होणार हे आता निश्चित आहे. यामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण होणे स्वाभाविक पण कामगाराच्या आनंदाचे रहस्य वेगळेच आहे. गत एक वर्षापासून कामगार व संघटना तनावात होते. पगारवाढ तर पाहिजे पण त्यासाठी पोटाची भाकर जावू नये म्हणून चिंताग्रस्त होते. वर्षभरापासून मागण्या संदर्भात असलेली अस्थिरता ही चिंतेची बाब होती. अखेर समझोता झाला व भाकरीची चिंता सुटली.
सनफ्लॅग कामगारांचा गुंता सुटला
By admin | Updated: February 28, 2015 00:48 IST