लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. प्रचंड नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी आता शेतकऱ्यांनी कंबर कसली असून जिल्ह्यात २१ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. या वर्षी प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने धानाचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. भंडारा जिल्हाप्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. अलीकडे सिंचनाच्या सुविधेमुळे दोन हंगामांत धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड खरीप हंगामात करण्यात येते. या वर्षीही खरिपात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड झाली होती. मात्र नैसर्गिक प्रकोपाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. वैनगंगेसह नदी-नाल्यांना आलेला महापूर, अतिवृष्टी आणि किडींच्या प्रादुर्भावाने धानाचे उत्पादन घटले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली. उन्हाळी हंगामात धान लागवडीची तयारी सुरू केली. जिल्ह्यात उन्हाळी धानासाठी २८२० हेक्टरवर पऱ्हे टाकण्यात आले होेते. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार १२२.४० हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड आटोपली आहे. यात भंडारा तालुक्यात १४६२ हेक्टर, मोहाडी ६२३ हेक्टर, तुमसर ६०६३ हेक्टर, पवनी २०२६ हेक्टर, साकोली ३८४९ हेक्टर, लाखनी ३०७७ हेक्टर, लाखांदूर ४०५० हेक्टर लागवड करण्यात आली आहे.
वातावरण बदलाचा फ्सतोय फटका शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली असून या धानालाही वातवरण बदलाचा फटका बसत आहे. गत आठवड्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने खोड कीडीसह करपा रोगाचे आक्रमण झाले आहे. शेतात कीड नियंत्रणासाठी फवारणी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाळी हंगामतरी साधावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.