लोकमत न्यूज नेटवर्क आंधळगाव : विद्यापीठाने परीक्षा क्षुल्क निर्धारित केले असले तरी, मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील श्री संत गजानन प्रशासकीय महाविद्यालयात अतिरिक्त शुल्क घेऊन विद्यार्थ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. अतिरिक्त शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांची टीसी अडवून त्यांचे शैक्षणिक नुकसान केले जात असल्याचाही प्रकार येथे पुढे आला आहे.
कांद्रीतील प्रशासकीय महाविद्यालय कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाशी संलग्नित आहे. या महाविद्यालयात परिसरातील गरीबघरची मुले शिकतात. अनेकांची आर्थिक स्थिती बेताची असतानाही अतिरिक्त शुल्कासाठी येथील प्राचार्य आणि लिपिक दबाव आणतात, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. २०१८-१९ पासून हे महाविद्यालय येथे सुरू आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क ६०० रुपये ठेवण्यात आले आहे; परंतु येथे विद्यार्थ्यांकडून ७०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना बळजबरी केली जाते. अतिरिक्त घेतल्या जाणाऱ्या १०० रुपयांची नोंद कुठेच नसते. यासंदर्भात महाविद्यालयाची बाजू ऐकण्यासाठी प्राचार्य प्रशांत वासनिक आणि संबंधित लिपिकाशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
२२ विद्यार्थ्यांचे कॉपी प्रकरण ताजेच याच महाविद्यालयातील प्रथम वर्षांच्या हिवाळी परीक्षेच्या अखेरच्या पेपरला चवक परीक्षागृहात मोबाइल घेऊन पेपर सोडविल्याचा प्रकार ताजा आहे. या प्रकरणी २२ विद्यार्थ्यांवर विद्यापीठाच्या भरारी पथकाने कारवाईही केली आहे. याच महाविद्यालयाचे प्राचार्य केंद्राध्यक्ष असताना त्यांच्या उपस्थितीतच हा गैरप्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांसोबत आर्थिक व्यवहार करून हा प्रकार घडल्याने संस्थाचालक या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबद्दल शिक्षणक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिष्यवृत्तीच्या २४ हजारांसाठी टीसी अडविलीयाच महाविद्यालयात बी.ए. पर्यंत शिक्षण पूर्ण करूनही टीसी न दिल्याने रत्नदीप सूर्यवंशी नामक विद्यार्थ्यांला पुढील शिक्षणापासून मुकावे लागल्याचा प्रकार घडला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात रत्नदीपने या महाविद्यालयातून बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याला मिळणार असलेली शिष्यवृत्ती विद्यापीठाकडून खात्यात न आल्याने त्याला महाविद्यालयाने टीसी दिलीच नाही. आधी २४ हजार रुपये जमा करून नंतर टीसी घेऊन जाण्यास महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले. अखेर या विद्यार्थ्याला वर्षभर शिक्षणापासून वंचित राहावे लागल्याची कैफियत त्याने 'लोकमत' जवळ मांडली.