लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सरकारी कामांसाठी सोयीचे ठरलेले 'ई-सेवा केंद्र' आणि 'आपले सरकार सेवा केंद्र' आता नागरिकांची अडवणूक करत असल्याचे समोर येत आहे. विशेषतः उत्पन्न, जात किंवा नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून निर्धारित शुल्कापेक्षा अनेक पटींनी जास्त पैसे उकळले जात असल्याचा आरोप होत आहे. ही लूटमार थांबवण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत.
विद्यार्थ्यांनो, अर्ज भरताना स्वतःचाच मोबाइल नंबर द्याअनेकदा सेवा केंद्रचालक अर्जावर स्वतःचा किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर टाकतात. यामुळे अर्जाची स्थिती आणि महत्त्वाचे संदेश केंद्रचालकाच्या मोबाइलवर येतात. यामुळे केंद्रचालकाला विद्यार्थ्यांची अडवणूक करणे सोपे जाते. हे टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना स्वतःचाच मोबाइल नंबर द्यावा. ओटीपी किंवा इतर कोणतीही माहिती शेअर करताना काळजी घ्यावी.
जास्त पैसे उकळल्यास कुठे तक्रार करणार?सेवा केंद्रावर जास्त पैसे आकारले जात असतील तर नागरिक थेट शासनाकडे तक्रार करू शकतात. तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच 'आपले सरकार' किंवा 'महा-ई-सेवा'च्या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा आहे.
विद्यार्थ्यांची अडवणूक करणे महागात पडणारशासनाने प्रत्येक सेवेसाठी शुल्क निश्चित केले आहे. तरीही अनेक ई-सेवा केंद्रचालक 'अर्ज भरण्याचा खर्च', 'प्रिंटिंग खर्च' किंवा इतर अनावश्यक कारणे सांगून जास्त पैसे आकारतात. अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना या दरांची माहिती नसते. अशा प्रकारे लूटमार करणे आता केंद्रचालकांना चांगलेच महागात पडणार आहे.
...तर केंद्राचा परवाना होईल रद्द'ई-सेवा केंद्रांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास ते कायद्याचे उल्लंघन आहे. जास्त पैसे मागणाऱ्या केंद्राचा परवाना तत्काळ रद्द होऊ शकतो.
'ई-सेवा' केंद्रावर कुठल्या कामासाठी किती रुपये ?शासनाने विविध सेवांसाठी शुल्क निश्चित केले आहे. या दराची यादी केंद्रावर दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.