लाखांदूर : घरकूल ठरावाची प्रोसिडिंग कॉपी मागण्याच्या कारणावरुन महिला सरपंच ग्रामसेविका यांच्यात शिवस्वराज्यदिनी फ्रीस्टाईल झाली होती. सदर घटना तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथे घडली असून ग्रामसेवक यांच्या तक्रारीवरुन महिला सरपंचाविरोधात ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यासह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदरील प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या भंडारा शाखेने निषेध नोंदविला असून हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. सदर मागणी गत ७ जून रोजी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
तुमसर तालुक्यातील सिलेगाव ग्रा. प. मध्ये शिवस्वराज्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला सरपंच संध्या पारधी व ग्रामसेवक मंजुषा शहारे यांच्यात घरकुल वाटपाच्या ठरावावर वाद झाला. तसेच प्रोसिडिंग कॉपी मागण्यावरुन वाद वाढतच गेला. प्रोसिडिंग कॉपी हिसकावण्याचाही प्रकार घडला. यावेळी ग्रा. प. च्या अन्य महिला सदस्याद्वारे ग्रामसेवकास जातीवाचक शिवीगाळीस अपशब्द बोलण्यात आल्याने वाद अधिकच वाढला.
सदर प्रकरणाने जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामसेवक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करीत सिलेगाव येथे ग्रामसेवक यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राज्य ग्रामसेवक संघातर्फे निषेध करण्यात आला असून हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात कडक कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास मुंडे, मानद अध्यक्ष विनोद भांडारकर, जिल्हाध्यक्ष कालिदास माकडे, सरचिटणीस सुधाकर चिंधालोरे यांसह अन्य ग्रामसेवक पदाधिकारी उपस्थित होते.