भंडारा : दिवसेंगणिक वाढत असलले उष्णतामान व पाण्याची टंचाई लक्षात घेता आजपासून (मंगळवार) जिल्ह्यातील शाळा सकाळ पाळीत भरविण्यात येत आहेत. सोमवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांच्या उपस्थिततीत झालेल्या जिल्हा शिक्षण समितीच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. दुपारी १२ वाजता सुरू जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या दालनात यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, उपशिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार, सातही तालुक्यातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षण समितीचे स्विकृत सदस्य रमेश सिंगनजुडे, आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. सभा सुरू होताच रमेश सिंगनजुडे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा सकाळपाळीत सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावर उपस्थित उपाध्यक्ष राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी शेंडे यांनी सर्वानुमते चर्चा घडवून आणून मंगळवार (१५ मार्च) पासून शाळा सकाळपाळीत भरविण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. यात सकाळी ७.२० ते ११.३० पर्यंत शाळा भरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळा आधीच सकाळपाळीत भरत आहेत. सद्यस्थितीत इयत्ता दहावीच्या परिक्षा सुरू असल्याने शिक्षकही परिक्षेच्या कामामध्ये व्यस्त आहेत. (प्रतिनिधी)प्रगत शैक्षणिक जिल्हास्तरीय कार्यशाळा जुलैमध्ये!प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात हा उपक्रम मोठ्या जोमात सुरू आहे. यासाठी शिक्षकगण तसेच यातील यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत. सध्या परीक्षेचा कालावधी सुरू झाल्यामुळे या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. हा मुद्दा रमेश सिंगनजुडे यांनी उपस्थित करून सदर जिल्हास्तरीय कार्यशाळा परीक्षा काळात न घेता नवीन सत्र सुरू होताच जुलैमहिन्यात घेण्यात यावा, असे सूचविले. यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, शिक्षणाधिकारी शेंडे तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले. परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर कुठलाही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात येवून सदर कार्यशाळा जुलै महिन्यात होण्यासंदर्भात संमत्ती घेण्याचे ठरविण्यात आले. तसेच २० टक्के पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येवू नये, आंतरजिल्हा बदली प्रकरणे निकाली काढण्यात यावी, एनओसी प्रकरणे निकाली काढावी आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली.वाढते उष्णतामान लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा सकाळी ७.२० ते ११.३० या कालावधीत भरविण्यात येणार आहे. शिक्षकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत कर्तव्यावर राहणे गरजेचे आहे. यासंबंधाने शक्य तेवढ्या लवकर निर्णय कळविण्यात आला आहे. -किसन शेंडे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा.शिक्षक व पालकांची मागणी तसेच वाढते उष्णतामान व पाण्याची टंचाई लक्षात घेऊन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्ह्यातील शाळा सकाळ पाळीत भरविण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. ती मागणी आजच्या बैठकीत पूर्ण करण्यात आली आहे. -रमेश सिंगनजुडे, स्वीकृत सदस्य, शिक्षण समिती, जि.प.भंडारा.
आजपासून शाळा सकाळ पाळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2016 00:47 IST