नाशिक : मधुमेहाशी संबंधित संशोधन करणाऱ्या रिसर्च सोसायटी फॉर स्टडी आॅफ डायबेटिज इन इंडिया (आरएसएसडीआय) आणि नाशिक असोसिएशन आॅफ फिजिशियन (एपीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चारदिवसीय आठव्या मधुमेहतज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेस प्रारंभ झाला. दरम्यान, शनिवारी (दि. ७) सकाळी ११.३० वाजता आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते हॉटेल एक्स्प्रेस इन येथे परिषदेचे उद्घाटन होईल.परिषदेत आज डॉ. नारायण देवगावकर यांच्या हस्ते इन्शुलीन पंप प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मधुमेहासाठी सर्वात आधुनिक असलेले व २४ तास रक्तातील साखर तपासून त्यासाठी आवश्यक असलेले इन्शुलीन या मशीनद्वारे दिले जाते. सदर सुविधा आता नाशिकमध्येही उपलब्ध झाली असल्याची माहिती परिषदेचे प्रवक्ते डॉ. समीर चंद्रात्रे यांनी दिली. डॉक्टर्स आपल्या प्रॅक्टीसमध्ये आधुनिक भ्रमणध्वनीचा उपयोग रुग्णसेवेसाठी कसा करू शकतात याबाबत डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी परिषदेत माहिती दिली. मधुमेही रुग्णांवर उपचार करताना उपकरणे कशी हाताळावी यावर डॉक्टरांमध्ये चर्चा रंगली. दुपारच्या सत्रात डॉ. यशपाल गोगटे, डॉ. सुजीत चंद्रात्रेय, डॉ. उन्नीकृष्णन, डॉ. मेहेतालीया, डॉ. नारायण देवगावकर, डॉ. अगरवाल यांची व्याख्याने झाली. ‘मधुमेह रुग्णांतील अत्यवस्थ रुग्ण’ या विषयावर डॉ. देवगावकर यांनी, तर ‘वयस्कर रुग्णांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर डॉ. अगरवाल यांनी विचार मांडले. भारतीय खाद्यपान व आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे याबाबत डॉ. शशांक जोशी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. तळवलकर व डॉ. समीर बॅनर्जी (कोलकाता) यांनी ‘मधुमेह आणि अर्धांगवायूचा झटका’ याबद्दल अधिक माहिती सांगितली. परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप डॉ. ए. के. पवार यांच्या ‘जुने ते सोने’ व डॉ. विजय पनीकर व डॉ. शैलजा काळे यांच्या ‘नवे ते चांगले’ या विषयावरील वादविवाद स्पर्धेने झाला. डॉ. राजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मृणालिनी केळकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)
मधुमेहतज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेस प्रारंभ
By admin | Updated: June 7, 2014 01:46 IST