कोविड - १९ या संसर्गजन्य विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर प्रकोप सुरू असल्याने शासनाच्या वतीने आरोग्य विभागामार्फत ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती व तलाठी यांच्या सहकार्याने उपकेंद्र स्तरावरील गावांमध्ये अँटीजेन चाचणीकरिता कॅम्प लावणे सुरू आहे. सध्या मुरमाडी/तूप आणि परिसरात सर्दी व तापाची साथ सुरू असल्यामुळे अनेक व्यक्ती अँटीजेन चाचणीत कोरोना संक्रमित असल्याचे निदान करण्यात येत आहे. अनेक गावांत कोरोना हॉटस्पॉट असल्याने प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असले तरी संक्रमित व्यक्तींचा गावात मुक्त संचार सुरू असल्यामुळे इतरही लोक बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुरमाडी/तूप आणि परिसरात दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंब व भूमिहीन शेतमजूर कुटुंबांची अधिक संख्या असल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या परिसरापासून ग्रामीण रुग्णालय २५ किमी, उपजिल्हा रुग्णालय ३० किमी तर सामान्य रुग्णालय ४५ किमी अंतरावर आहे. दळणवळणाच्या साधनांचा अभाव व लॉकडाऊनमुळे संक्रमित रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेता येत नाही. मुरमाडी/तूप येथे कोविड उपचार केंद्रासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळेची इमारत आणि खासगी शाळेची इमारत उपलब्ध असून या इमारती लोकवस्तीपासून दूर आहेत. त्यामुळे संक्रमणाची शक्यता नाही. तसेच गावकऱ्यांना परिसरातच उपचाराची सोय उपलब्ध करण्याचे दृष्टीने मुरमाडी/तूप येथे कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लाखनी तालुकाध्यक्ष जितेंद्र बोंद्रे यांनी केली आहे.
मुरमाडी/तूप येथे कोविड उपचार केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST