लोकवाहिनी होणार आॅनलाईन : मिनिटात मिळणार माहितीभंडारा : महाराष्ट्राची लोकवाहिनी ठरलेल्या एसटीला लवकरच जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीने जोडले जाणार आहे. नव्या तंत्रज्ञानाला आपलेसे करत महाराष्ट्र राज्य रस्ता परिवहन महामंडळाने आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. आगारातून निघाल्यानंतर प्रवासादरम्यान एसटी कोणत्या मार्गावर आहे, एसटीमध्ये किती प्रवासी आहेत, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.एसटी महामंडळाने वाहकांच्या हाती असणाऱ्या तिकीट मशिनमध्ये जीपीएस सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून एसटीचे ट्रॅकिंग केले जाणार आहे. दरम्यान त्यासाठी नवीन मशिन्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच जीपीएस सिस्टीम असलेल्या तिकीट मशीन विभागवार दिल्या जाणार आहेत. तूर्तास महामंडळाकडे १७,९५६ वाहने असून त्यातील १६,६२५ एसटीने प्रवाशांची वाहतूक होते. राज्यातील ९० टक्के लोकसंख्येपर्यंत एसटी बससेवा थेट पोहोचली आहे. एसटी महामंडळाने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत बदल करण्यास सुरुवात केली आहे. जुन्या वेळखाऊपद्धती बदलून त्यांची जागा नव्या तंत्रज्ञानाने घेतली. प्रवाशांना घेऊन बसने थांबा किंवा आगार सोडल्यानंतर परतीच्या प्रवास आटोपल्यानंतरच त्या एसटीची माहिती मिळत होती. एसटी बस कोणत्या मार्गावर आहे, त्यात प्रवासी किती आहेत, एसटीला कुठे अपघात झाला का?, याचे उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे एसटीचे प्रवासाचे नियोजनही कोलमडत असल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यावर जीपीएस ट्रॅकिंगचा पर्यात शोधण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
एसटीलाही आता जीपीएस ट्रॅकिंग!
By admin | Updated: April 15, 2016 00:48 IST