लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : शेतशिवारात ट्रॅक्टरने माती काढणे सुरु असताना ट्रॅक्टर चालकाला विषारी साप दिसला. त्याने सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावले. मात्र सापाचा जीव वाचविणाऱ्या सर्पमित्रालाच सापाने दंश केला. मात्र न डगमगता सर्पमित्राने क्षणार्धात सापाला हातातच गुंडाळून उपचारासाठी थेट रुग्णालय गाठले. ही घटना १२ डिसेंबरच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सोनी येथे घडली. जनार्दन महादेव भैरव (७३, सोनी) असे सर्पदंश झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे
सविस्तर असे, सोनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टरने शेतातील माती खोदकाम सुरू असताना चालकाला शेतात साप आढळून आला. ट्रॅक्टरमध्ये सापडून सापाचा मृत्यू होऊ नये म्हणून चालकाने सर्पमित्राला मोबाइलद्वारे संपर्क साधून पाचारण केले. माहितीवरून सर्पमित्र जनार्दन घटनास्थळी दाखल झाला व सापाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. अशातच त्या विषारी सापाने जनार्दनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दंश केला.
मात्र जनार्दनने सापाला जिवंत पकडून उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. या घटनेची माहिती होताच पोलिस हवालदार संतोष चव्हाण यासह अन्य पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
अन् डॉक्टरांचीही उडाली तारांबळ हाताला साप गुंडाळलेल्या अवस्थेत जनार्दन रुग्णालयात दाखल होताच रुग्णालयातील रुग्णांसह डॉक्टरांची तारांबळ उडाली. त्यावेळी जनार्दनने हाताला गुंडाळलेल्या सापाला मोकळे करीत एका प्लास्टिक बरणीत केंद केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केला. सध्या जनार्दनशी प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.