भंडारा : सिंचनातून समृद्धीचे स्वप्न पाहत बावनथडी नदीवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभारण्यात आला. कालवेही तयार करण्यात आले. मात्र, या प्रकल्पाचा लघु कालवा क्रमांक २ अद्यापही कोरडाच आहे. खमाटा ते टाकळीजवळ कालवा अपूर्ण असल्याने सिंचन अशक्य झाले आहे. या प्रकल्पाचे पाणी सोडून शेतकऱ्यांना सुविधा द्यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा अन्यायग्रस्त शेतकरी समितीने केली आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यावर आंतराज्यीय बावनथडी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर तुमसर आणि मोहाडी तालुक्यात सिंचन केले जाते. तुमसर तालुक्यांतर्गत बावनथडी प्रकल्प लघु कालवा क्रमांक २ ला दहा वर्षांपूर्वी राज्य शासनाने मंजुरी दिली. बावनथडी प्रकल्पापासून ६० कि.मी. अंतरापर्यंत खमाटा गावापर्यंत कालव्याचे काम पूर्ण झाले आहे; परंतु तेथून टाकळीपर्यंत सुमारे १ किलोमीटर बांधकामच पूर्ण झाले नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले; परंतु अद्यापही कोणतीच कारवाई झाली नाही.
खमाटा (टाकळी) येथील शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. उपजीविकेसाठी शेतीशिवाय पर्याय नाही. यावर्षी वैनगंगा आणि सूर नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही नुकसानभरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड केली. या धानाला आता पाण्याची गरज आहे; परंतु कालव्याचे काम अपूर्ण असल्याने खमाटा येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. बावनथडी प्रकल्प लघु कालवा क्रमांक २ चे बांधकाम पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाॅक्स
अन्यायग्रस्त शेतकरी समितीचे निवेदन
भंडारा जिल्हा अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अपर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, अशोक पवनकर, पुरुषोत्तम गायधने, विकास निंबार्ते, विकास मेश्राम, कोठीराम पवनकार आदी उपस्थित होते.