पॅनकार्ड सक्तीचा निषेध : उलाढालीत ३० टक्के घटभंडारा : सरकारने २ लक्ष रुपये व त्यावरील दागिने खरेदीवर पॅनकार्ड दाखविणे सक्तीचे केल्याच्या निषेधार्थ आज सराफा व्यवसायीकांनी कडकडीत बंद पाडला.विशेष म्हणजे शासनाने महिनाभरापूर्वी हा नियम जाहीर केल्यापासून सोने चांदीच्या व्यवसायात जवळपास ३० टक्के घट झाल्याचे दिसून येते. या संदर्भात भंडारा सराफा असोसिएशनच्या भंडारा सुवर्णकार युवक समितीच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात १ जानेवारी २०१६ पासून शासनाने २ लक्ष रुपये व त्यावरील खरेदीवर पॅनकार्ड दाखविणे सक्तीचे केले आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांवरील या नियमामुळे व्यवसायाला फटका बसला आहे. देशभरातील ज्वेलरी उद्योगातील मंदीमुळे लाखो कामगार व लहान व्यापारी संकटात सापडले आहेत. परिणामी संपूर्ण उद्योगासाठी अस्तित्व टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. बहुतांश लोकांकडे स्वत:च्या नावाचे पॅन कार्ड नसल्याने व्यवसायीकांना ग्राहक पाठ दाखवित आहेत. अनेक संघटना आणि ज्वेलर्स व्यवसायीकांना मागील एक महिन्यात अंदाजे ३० टक्के नुकसान सोसावे लागले. अशीच परिस्थिती अधिक काळ राहिल्यास अनेक कामगार, कारागिर व कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २ लाख ऐवजी १० लाख रुपयांच्या खरेदीवर पॅन कार्ड सक्तीचे करावे अशी मागणी सराफा असोसिएशनने केली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. जाचक अटीचा निषेध नोंदविण्यासाठी १० फेब्रुवारीला एक दिवसीय सराफा दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्वच दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. भंडारा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, नितीन सोनी, युवक समितीचे अध्यक्ष निखील लेदे, तुषार काळबांधे, जनार्दन मस्के, प्रशांत माटूरकर, राजेश करंडे, विशाल ढोमणे, धर्मेंद्र माटूरकर, मिनल जैन, अनिल मस्के, सचिन लेदे, श्रीकांत मस्के, प्रतीम फाये, अमित फाये, रोशन निनावे, ज्ञानेश्वर रोकडे यासह अन्य सराफा व्यवसायीक आंदोलनात सहभागी झाले. (प्रतिनिधी)
सराफा दुकाने कडकडीत बंद
By admin | Updated: February 11, 2016 00:52 IST