शुभमंगल सावधानचा गजर झाला ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 05:00 AM2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:00:54+5:30

मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिका, कपडे खरेदी, वाजंत्री, किराणा यासह इतर वस्तू खरेदी होतात. परंतु यंदा लग्न सोहळेच नाही तर खरेदीही ठप्प झाली आहे. त्यातच अनेकांचा रोजगारही गेला आहे.

Shubhmangal Sawadhan 'Lockdown' | शुभमंगल सावधानचा गजर झाला ‘लॉकडाऊन’

शुभमंगल सावधानचा गजर झाला ‘लॉकडाऊन’

Next
ठळक मुद्देलग्नसोहळे थांबले : आनंदाच्या उत्सवात कोरोनाचे विरजण

राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : उन्हाळ्याची चाहूल लागली की सुरु होतो लग्नसराईचा हंगाम. गावागावांत अन् शहरातही घुमू लागतात शुभमंगल सावधानचा गजर. परंतु यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचे संकट आले. सर्व लॉकडाऊन झाले. आनंदाच्या उत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागले. कधी लॉकडाऊन संपते याची विवाह इच्छुकांना प्रतीक्षा लागली आहे.
गावखेड्यात मार्च ते जून अखेरपर्यंत लग्नकार्य आयोजित केले जाते. मृग नक्षत्रापूर्वी लग्न आटोपण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यानंतर लग्नकार्य होत नाही. डिसेंबर, जानेवारीपासून स्थळ शोधण्यास प्रारंभ होतो. पसंती आटोपली की साक्षगंध पार पडतो. त्यानंतर सुरु होते लग्नाच्या खरेदीची गडबड. खरेदी आटोपली की आप्तस्वकीयांना पत्रिका वितरीत करून लग्नाला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले जाते.
यंदा मात्र अशी धामधूम कुठेच दिसत नाही. फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरोनाचे काळे ढग घोंगावू लागले होते. मार्च महिन्यात तर थेट संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले. यापूर्वी लग्न जुळलेल्यांनी एक तर घरगुती पद्धतीने लग्न आटोपले किंवा पुढे ढकलले. मात्र लग्न समारंभामुळे होणारा व्यवहार ठप्प झाला. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरचेही लग्न लाखाच्या घरात असते. पत्रिका, कपडे खरेदी, वाजंत्री, किराणा यासह इतर वस्तू खरेदी होतात. परंतु यंदा लग्न सोहळेच नाही तर खरेदीही ठप्प झाली आहे. त्यातच अनेकांचा रोजगारही गेला आहे.
आनंदाच्या सोहळ्यात कोरोनाने विरजण घातले असून विवाहोच्छूक मंडळी आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र हा लॉकडाऊन केव्हा संपेल हे कुणीही सांगत नाही. कोरोनाच्या या महासंकटाने सर्वांना हादरवून सोडले असून सर्वच जण आता घराबाहेर पडण्यासाठी उत्सूक झाले आहेत. मात्र सर्वाधिक अडचण होत आहे ती वधू-वर पित्यांची.

‘ऐका सत्यनारायणाची कथा’ही थांबली
ग्रामीण भागात लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची कथा करण्याची परंपरा आहे. चौरंग, केळीचे खुंट, पाण्याचा कलश, नवग्रहाच्या आणि अष्टदिशांच्या सुपाऱ्या आदीसह प्रसाद अशी सामुग्री तयार करून पूजा केली जाते. ध्वनीक्षेपकावरून ऐका सत्यनारायणाची कथा हे गीत ऐकू येते. मात्र यंदा शुभकार्यच नाही तर सत्यनारायणाची कथा तरी कोण करणार आणि त्यावर अवलंबून असणारे पुरोहितही बेजार झाले आहेत.

Web Title: Shubhmangal Sawadhan 'Lockdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.