जिल्ह्यातील प्रथम ग्रामपंचायत : जिल्हा परिषदने केला सत्कारभंडारा : ग्रामीण पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिवनी ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा पर्यावरण विकासरत्न पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार १ मे ला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी यांच्या हस्ते देण्यात आला.जल, जमीन, जंगल, हवा, वनस्पती आदींचे योग्य व्यवस्थापन करुन भौतिक सोयी सुविधांची पर्यावरण संतुलन ठेवण्याच्या दृष्टीने लाखनी तालुक्यातील शिवनी (मोगरा) ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने महत्वपूर्ण कार्य केले. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने लोकसंख्या एवढी झाडे लावून ती जगविले. मागील चार वर्षात ग्रामपंचायत कर आकारणी व सुधारित कर आकारणी १०० टक्के कर वसुली करुन आर्थिक बाजु बळकट केली. यासोबतच अपारंपरिक ऊर्जा, बायोगॅस, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, यशवंत पंचायत राज अभियानात ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवून शासनाकडून पुरस्कार मिळविले. शिवनी ग्रामपंचायतीला यावर्षी राज्य शासनाने पर्यावरण विकासरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार वितरण सोहळा १ मे रोजी भंडारा जिल्हा परिषदेत पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार ग्रामपचांयतीचे सचिव जयंत गडपायले, सरपंच पद्माकर बावणकर, उपसरपंच प्रमोद खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खोब्रागडे, जीवनदास नागलवाडे, सदस्या रंजना नागलवाडे, रुपाली हारमुडे, सविता मेश्राम, पंचायत समिती सदस्या रसिका कांबळे यांनी स्वीकारला. पुरस्कार वितरण सोहळयाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आळे, समाजकल्याण सभापती अरविंद भालादरे यांच्यासह जिल्हा परिषदचे विविध विभागाचे सभापती व अधिकारी वर्ग उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शिवनी ग्रामपंचायत पर्यावरण विकासरत्न पुरस्काराने सन्मानित
By admin | Updated: May 4, 2015 00:45 IST