लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद सोमवारी झाली असून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून भंडारा तालुक्यातील गराडासह पाच गावे पाच गावे सील करून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन घोषीत करण्यात आला. कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील सहा व्यक्तींना संस्थेत अलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या घश्यातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.लॉकडाऊन घोषीत झाल्याच्या ३५ दिवसानंतर भंडारा जिल्ह्यात ४५ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त असल्याचे सोमवारी आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ग्रीनझोन राखण्यात आतापर्यंत प्रशासनाला यश आले. मात्र सोमवारी कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाली. सदर महिला भंडारा तालुक्यातील गराडा बुजरूक येथील रहिवासी असून सदर गावाच्या परिसरातील गराडा खुर्द, मेंढा, बासोरा, बोरगाव बुज. (पुर्नवसन) हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करण्यात आले. सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. सदर परिसरात घरोघरी रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एक डॉक्टर, आशा वर्कर नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांच्या परिवारातील, संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले. सदर महिलेच्या निकटसंपर्कात आलेल्या सहा व्यक्तींना संस्थेत अलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या घश्यातील स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्त आढळलेल्या महिलेचा प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. त्यामुळे तिला कोणामुळे कोरोना संसर्ग झाला याचा शोध प्रशासन घेत आहे.६९ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षाभंडारा जिल्ह्यातून आतापर्यंत ३५३ नमूने तपासणीसाठी पाठविले असून २८३ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आणि एक नमूना पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी १३ व्यक्तींचे आणि यापुर्वी पाठविलेल्या असे ६९ व्यक्तींच्या अहवालाची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. तर तीर्व श्वासदाह अंतर्गत ७४ व्यक्ती दाखल असून या सर्वांचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ६७ नमूने निगेटिव्ह आले असून सहा अहवालांची प्रतीक्षा आहे.आयसोलेशन वॉर्डात १९ व्यक्तीभंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १९ व्यक्ती दाखल असून येथून ९८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. तर सोमवारी ५७ व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मोहाडी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये १४ व्यक्तींना दाखल करण्यात आले असून त्या सर्वांचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ते सर्व अहवाल सध्या अप्राप्त आहेत.