साकाेली तालुक्यातून चुलबंद नदी वाहते. येथील रेती प्रसिद्ध आहे. त्यामुळेच तस्करांचा या घाटांवर डाेळा असताे. सासरा, मिऱ्हेगाव, परसाेडी, खंडाळा, पळसगाव, सुकळी, महालगाव या क्षेत्रात मुबलक रेती उपलब्ध आहे. आता नदीला पूर येण्यापूर्वी रेती उत्खननासाठी तस्करांमध्ये चढाओढ सुरू आहे. सासरा आणि मिऱ्हेगाव घाटावर तर दरराेज रात्रीपासून पहाटेपर्यंत रेतीचे उत्खनन सुरू असते. नदीपात्रातून उत्खनन केलेली रेती तीरावर साठवली जाते. तेथून ट्रक व ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक केली जाते. हा प्रकार महसूल विभागाला माहीत आहे. परंतु कारवाई केली जात नाही. यामुळे शासनाच्या लाखाे रुपयांच्या महसुलाला चुना लागत आहे. अहाेरात्र हाेणाऱ्या वाहतुकीने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परंतु याचे कुणाला काही देणेघेणे नाही. जिल्हाधिकारी संदीप कदम, तहसीलदार रमेश कुंभरे, नायब तहसीलदार, डी. आर. मडावी यांनी लक्ष देऊन या रेतीचाेरीला आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच रेती तस्करांवर कठाेर कारवाई करण्याची मागणी आहे.
नदीतीरावर रेतीचा साठा
तालुक्यातून वाहणाऱ्या नदी तीरावर तस्करानी माेठ्याप्रमाणात रेतीचा साठा करुन ठेवला आहे. नदीला पूर येण्यापूर्वी उत्खनन करून साठा केला जात आहे. रात्रभर नदीपात्रात उत्खनन केल्यानंतर दिवसा या रेतीची वाहतूक केली जाते. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही काेणताच उपयाेग झाला नाही.