भंडारा : धानपीक करपू लागले असून अशातच आलेल्या दिवाळी सणाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. या दिवसाचा आनंद साजरा करता आला नसला भाऊबीजेला बहीण आल्याचा आनंद आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी विवंचनेत गेल्याचे दिसून आले आहे.अंगणात लांबलचक व दाराच्या दोन्ही बाजूला लावल्या जाणाऱ्या दिव्यांची आरास यंदाच्या दिवाळीत कापसाची वात तेलात भिजवून प्रकाशाचे पर्व साजरा केल्याचा आनंद साऱ्यांनी घेतला. पण विवंचना कायम होती. दिवाळी आर्थिक उलाढालीचा सण. शेतकरी दरवर्षी धान विकून सण साजरा करतो. परंतु पावसाअभावी दुबार पेरणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील पीके हाती आली नाही.नापिकीत दसरा झाला. धनत्रयोदशीला सोने खरेदी करतात. सोन्याचा मणी घ्यावा, ही आशा तर पूर्ण झालीच नाही, उलट सुवर्ण तारण घेवून बहुतांश शेतकऱ्यांना दिवाळी सणाला सामोरे जावे लागले आहे. भाऊबीजेपासून आर्थिक उलाढालीला वेग येतो. दिवाळी दिवाळं काढणारी आहे, असे बोलले जात असले तरी भाऊबीज आपापल्यापरीने साजरी करतात. या दिवसापासून बाजारपेठेत गर्दीला सुरूवात होते. कापड व स्टील भांड्याच्या दुकानात आर्थिक व्यवहाराला चालना मिळत असताना किराणा दुकानामधून मालाची उचल होते. बहीण, जावई, भाचा, भाची यांच्यासोबत साजरा होणारा हा सण पाहुणचारासह देवाणघेवाणीचा असतो. विवंचनेत असलेले शेतकरी दिवाळी सणाला सामोरे गेले असून यावर्षीची भाऊबीज आणि बहीण एकमेकांची आर्थिक बाजू समजावून घेवून साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यातही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट येथे कायम राहण्याची भीती आहे. दिवाळीनंतरच उधारी चुकता ग्रामीण भागात वार्षिक उधारीवर आर्थिक व्यवहार केला जातो. यात किराणा व कापड दुकानदाराचा समावेश असतो. खरिपातील पिकापासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून दिवाळीपूर्वी जुनी उधारी चुकता करून नवीन व्यवहाराला सुरूवात केली जाते. पण गत काही वर्षानंतर या दिवाळीपूर्वी खरीपातील पिकापासून उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे या दुकानदाराची उधारी शेतकरी चुकता करू शकले नाही. यामुळे दुकानदारही आर्थिक अडचणीत सापडले आहे. पण दिवाळीनंतर खाते चुकता करतील, अशी आशा दुकानदारांना आहे. (नगर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना धान विकण्याची घाई
By admin | Updated: October 27, 2014 22:30 IST