सिराज शेख - मोहाडी तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय फक्त एका डॉक्टरच्या भरोशावर चालत आहे. येथे चार डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे.तालुक्यातल ७० हजार गरीब व सामान्य परिवारातील जनता या रुग्णालयावर आश्रीत आहेत. तसे पाहता मोहाडी तालुक्यात पाच वर्षापासून ते ८० वर्षापर्यंतचे अंदाजे २ लक्ष नागरिक आहेत. त्यापैकी ७० ते ८० हजार नागरिकांचा थेट संबंध मोहाडीच्या या रुग्णालयाशी येतो. शासनाने या रुग्णालयात ई.सी.जी., रक्तातील कोलोस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, शुगर, रक्त तपासणी सारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र डॉक्टरच नसल्याने या सुविधा निरुपयोगी ठरल्या आहेत.ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे जागा अपुरी पडत आहे. अनेक प्रकारच्या चाचण्या करणाऱ्या मशिन ठेवण्यासाठी व रुग्णांची तपासणी करण्यासाठी या रुग्णालयात खोल्याच उपलब्ध नाही. त्यामुळे विस्तारीत भवन तयार करण्याची आवश्यकता आहे. औषधी कक्ष अपुरा पडत असल्याने अनेक प्रकारच्या औषधी व साहित्य कक्षाबाहेर उघड्यावर ठेवलेला आहे. मोहाडी ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व तीन एम.बी.बी.एस. डॉक्टर तसेच एक युनानी डॉक्टरची जागा रिक्त आहे. या रुग्णालयाला आज पर्यंत तरी एकही प्रकारचा तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी मिळालेला नाही. मोठ्या प्रमाणात रूग्ण उपचारासाठी येते त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे लक्ष द्यावे.
ग्रामीण रुग्णालयाचा कारभार एकाच डॉक्टरवर
By admin | Updated: October 4, 2014 23:22 IST